नागपूर : डोळा फोडल्यामुळे पीडित शिंपीला सहा लाख रुपये भरपाई अदा करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी आरोपी डॉक्टरला दिला आहे. ही वाशीम जिल्ह्यातील घटना आहे.
डॉ. श्यामराव दौलतराव पाटील, असे आरोपीचे नाव असून ते शेलू बाजार, ता. मंगरुळपीर येथील रहिवासी आहेत. भरपाई अदा करण्यासाठी आरोपीला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. भरपाई अदा न केल्यास आरोपीला एक वर्ष कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. तसेच, आरोपीने कारावासाची शिक्षा भोगल्यानंतरही पीडिताला उपलब्ध कायदेशीर मार्गाने भरपाई वसुल करता येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोट्यवधी रुपयाची भरपाई दिली तरी, पीडिताची दृष्टी परत येऊ शकत नाही. परंतु, सहा लाख रुपये भरपाईमुळे त्याला थोडा दिलासा मिळेल, असे मत न्यायालयाने हा आदेश देताना व्यक्त केले. हिम्मतराव सखाराम जाधव, असे पीडिताचे नाव आहे. जाधवला दिवाणी न्यायालयानेही २ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
पाटीलच्या घरातील सांडपाणी नेहमीच रोडवर वाहत होते. १३ एप्रिल २००४ रोजी त्यासंदर्भात टोकले असता, पाटील व त्यांच्या पत्नी विजया यांनी जाधव व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. दरम्यान, पाटीलने दगड मारून जाधवचा डावा डोळाही फोडला, अशी तक्रार होती. १६ मार्च २००९ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने पाटीलला दोन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड तर, विजया यांना सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर ३ ऑगस्ट २०१३ रोजी सत्र न्यायालयाने पाटीलची शिक्षा कायम ठेवली तर, विजया यांना निर्दोष सोडले. परिणामी, पाटीलने शिक्षेविरुद्ध तर, जाधव यांनी विजया यांच्या निर्दोषत्वाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हा सुधारित निर्णय देऊन त्या याचिका निकाली काढल्या.