लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया), अप्लास्टिक अॅनिमियामध्ये रु ग्णाच्या शरीरात रक्ताची निर्मिती होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये बाहेरून रक्त व रक्तघटक देण्याची गरज पडते. अर्थात, एकदा-दोनदा रक्त वा रक्तघटक देऊन भागत नाही, तर वारंवार अशा रु ग्णांना रक्त द्यावे लागते. परंतु या आजाराची नोंद शासनाच्या यादीत नाही. परिणामी, राज्यभरातील रुग्णांची परवड होत आहे. रक्तापासून ते औषधीचा खर्च त्यांना पेलावा लागत आहे.हाडामध्ये रक्त तयार करण्याचे कार्य बोन मॅरो (अस्थिमज्जा) करीत असतो. बोन मॅरोने रक्त तयार करण्याचे कार्य व्यवस्थित होत नसेल तर हाडांच्या पोकळीत कॅल्शियम तयार होते. यामुळे रक्ताक्षय (अॅनिमिया) होतो. बोन मॅरो फेल झाल्यास ‘अप्लास्टिक अॅनिमिया’ हा आजार होतो. यात हिमोग्लोबीन फार कमी राहते आणि प्लेटलेटस्ची संख्याही कमी होते. यामुळे वारंवार रक्त द्यावे लागते. या आजाराचा रुग्ण साधारणपणे एक हजारात एखादा आढळून येतो. सुरुवातीला या आजाराची लक्षणे ही तापासारखीच असतात, नंतर मात्र रक्तातील पेशी कमी होतात आणि रक्त तयार होण्याची प्रक्रियाच थांबते. या आजाराच्या रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता असल्याने, रुग्ण रक्तपेढीच्या पायऱ्या झिजविताना दिसतात.ज्या आजारांसाठी रक्ताची नियमित गरज भासते, अशा रुग्णांना राज्यभरातील रक्तपेढ्या मोफत रक्तपुरवठा करीत असतात. शासनाने मान्य केलेल्या अशा आजारांमध्ये सिकलसेल अॅनिमिया व थॅलेसिमीया या दोन आजारांचा समावेश आहे. या दोन्ही आजाराच्या रुग्णांना मुंबईच्या राज्य रक्त संक्रमण पेढीमार्फत विशेष कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारावर संबंधित रुग्णाला कोणत्याही रक्तपेढीतून रक्ताचा तात्काळ पुरवठा केला जातो; याशिवाय प्रवास खर्चात सवलत व आता दहावीच्या परीक्षेत २० मिनिटांचा अवधी वाढून दिला आहे. या दोन आजारांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही आजाराचा समावेश राज्य रक्त संक्रमण पेढीच्या यादीत नाही. त्यामुळे अप्लास्टिक अॅनिमियाच्या रुग्णांना रक्तासाठी धावाधाव करावी लागते.
यादीत नोंद झाल्यास रुग्णांसाठी हितावहहजारो रुग्णामधून एक रुग्ण अप्लास्टिक अॅनिमियाचा आढळून येतो. या आजारात रक्त तयार होण्याची प्रक्रियाच थांबत असल्याने रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. यामुळे शासनाने या आजाराच्या रुग्णांना राज्य रक्तसंक्रमण पेढीच्या यादीत समाविष्ट केले तर या रुग्णांसाठी ते हितावह ठरेल, अशी मागणी होऊ घातली आहे.
गंभीर आजारएक दुर्मिळ आणि गंभीर असा हा आजार असून रुग्णाच्या शरीराची वाढ थांबविणारा अशक्तपणा म्हणजे अप्लास्टीक अॅनिमिया आहे. हा आजार टायफाईडवरील अॅण्टीबॉयटीक्सचे जास्त डोज झाल्यामुळेही होतो. या आजारामुळे रुग्णाच्या शरीरात नवीन रक्त पेशींचे उत्पादन होण्याची प्रक्रिया थांबते. हा आजार अचानकपणे उद्भवू शकतो किंवा तो हळूहळू होतो.