नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या मागील काही दिवसात झपाट्याने कमी झाली. मात्र मागील चार दिवसाची आकडेवारी पाहता रुग्णसंख्या स्थिरावल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी पुन्हा ४६ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील २१, ग्रामीणमधील २४ तर जिल्हाबाहेरील १ रुग्ण व १ मृत्यू आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७६,९१६ तर, मृतांची संख्या ९,०२३ वर पोहचली आहे.
कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यापासून ओसरायला सुरुवात झाली असली तरी जून महिन्यात आटोक्यात आली. १ जून रोजी २०३ वर असलेली रुग्णसंख्या १० जून रोजी ९१ तर, १९ जून रोजी १६ वर आली. परंतु २० ते २४ जून या चार दिवसात दैनंदिन रुग्णांची संख्या ३९ ते ४६ दरम्यान आहे. गुरुवारी जिल्ह्यात ६,६४७ चाचण्य झाल्या. त्यातुलनेत ०.६९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात ५,२०८ चाचण्यातून ०.४० टक्के तर, ग्रामीणमध्ये १,४३९ चाचण्यातून १.६६ टक्के बाधित रुग्ण आढळून आले. सलग चौथ्या दिवशी शहर व ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली. आज ८७ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,६७,२७७ झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९७.९८ टक्क्यांवर आला आहे.
- कोरोनाच्या ९८ टक्के खाटा रिकाम्या
नागपूर जिल्ह्यात ६१६ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील ४३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर, १८६ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत. सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये आहेत. येथे ४० रुग्ण उपचार घेत आहेत. मेयोमध्ये १०, एम्समध्ये ६ तर खासगी रुग्णालयांमध्ये १३० रुग्ण आहेत. जवळपास ९८ टक्के खाटा रिकम्या आहेत. एकीकडे नॉन कोविडचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाच्या रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवणे विशेषत: खासगी रुग्णालयांना न परवडणारे झाले आहे.
:: कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ६,६४७
शहर : २१ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : २४ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७६,९१६
ए. सक्रिय रुग्ण : ६१६
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६७,२७७
ए. मृत्यू : ९,०२३