मेडिकलच्या रुग्णांना दिवाळीनिमित्त कपड्यांची भेट : समर्पण संस्थेचा उपक्रमनागपूर : मेडिकलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आनंद मिळावा म्हणून ‘समर्पण’ ही संस्था गेली १६ वर्षांपासून विधायक कार्य करीत आहे. दिवाळीच्या दिवसात रुग्णांना नव्या कोऱ्या कपड्यांची भेट देत अनोखी दिवाळी साजरी करीत आहे. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणाऱ्या या सणाची खासियत काही औरच... दारासमोरची रांगोळी, आकाशकंदिल, फराळ आणि फटाक्यांसह दिवाळीच्या चार दिवसांमध्ये सर्वत्र उत्साह संचारला असतो, मात्र रुग्णालयात काहीसे वेगळे वातावरण असते. दुखणे सोसावत नसताना नाउमेद होत असलेले मन, तोच तो औषधांचा दर्प, उपचार करण्याची परिस्थिती नसताना संघर्ष करीत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक. दिवाळीच्या झगमगाटापासून दूर असलेल्या या रुग्णांच्या चेहऱ्यावरही या सणाचा आनंद दिसावा, यासाठी समर्पण दिवाळीच्या प्रारंभीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) साधारण ७५० ते ८०० रुग्णांसाठी नव्या कपड्याची खरेदी करते आणि धनत्रयोदशीला भेट देते. शुक्रवारी महिलांना साड्या, पातळ, पुरुषांना शर्टस् व लहान मुलांसाठी ड्रेस अशा कपड्यांची अनोखी भेट देण्यात आली. ही भेट स्वीकारताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. ‘समर्पण’ आणि रुग्णांमध्ये एक हळूवार भावनिक नाते जुळले होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. सोनपुरे, माधव भोसले, समर्पणचे हनुमानप्रसाद राठी, जीवन वाळके, अनिल किनारीवाला आदी उपस्थित होते.समर्पण संस्थेतील प्रत्येक जण आपल्या व्यवसायात मिळालेल्या नफ्यातील काही भाग या स्तुत्य उपक्रमावर खर्च करतात. ‘समर्पण’चा दिवस मेडिकलमध्ये सकाळी ७ वाजतापासून सुरू होतो. तब्बल ४० वॉर्डातील रुग्णांना फळांची न्याहरी देतात. ही सेवा देत असताना बाहेरगावातील रुग्णांच्या नातेवाईकांना दुपारचे जेवणही देतात. साधारण ४०० वर रुग्णांचे नातेवाईक तृप्त होऊन जातात. राजाबाक्षातील ‘समर्पण’ वास्तूत वर्षाचे ३६५ दिवस हे अन्नछत्र सुरू असते. (प्रतिनिधी)
रुग्णांना मिळते आनंदाचे ‘समर्पण’
By admin | Published: October 29, 2016 2:31 AM