मनपाची मनमानी : कोरोनाबाधित अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमण झपाट्याने वाढत आहे. परिणामी सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजाराहून अधिक झाली आहे. यातील सुमारे १५ हजार होम आयसोलेशनमध्ये आहेत. परंतु होम आयसोलेशनमधील रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. आठवडाभरापासून त्यांना कोविड औषध उपलब्ध झालेले नाही. मास्कच्या नावाखाली मनपाने आतापर्यंत १.६४ कोटी जमा केले. परंतु रुग्णांना औषध उपलब्ध करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचा रुग्णांचा आरोप आहे.
यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक माहिती मिळाली. राज्य सरकार व टास्क फोर्सच्या दिशानिर्देशानुसार आता होम आयसोलेशनमधील रुग्णांना फॅविपिरावीर टॅबलेट देण्यात येणार नाही. कारण होम आयसोलेशनमध्ये कमी लक्षणे असलेले रुग्ण आहेत. त्यामुळे त्यांना औषधाची गरज नसल्याने त्यांना औषधी उपलब्ध केली जात नाही. यासंदर्भात आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सर्व झोनचे आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनपाच्या औषध गोदामात एप्रिल २०२१ एक्सपायरी असलेली औषधी शिल्लक आहे. याचा विचार करता सर्व औषधी आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आली आहे. सध्या मनपाच्या औषध गोदामात कोविडची औषधी उपलब्ध नाही. होम आयसोलेशनमधील रुग्णांना तापावर पॅरासिटामल गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती आहे. जी औषधी उपलब्ध होती, ती रुग्णालयांना वितरित करण्यात आल्याची माहिती मनपाच्या औषध गोदामाचे प्रमुख प्रशांत भातकुलकर यांनी दिली. जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना आता फॅविपिरावीर न देण्याचे आदेश जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
....
रुग्णांना औषध मिळत नाही
गेल्या आठवडाभरापासून होम आयसोलेशनमधील रुग्णांना कोविड औषधी मिळत नाही. यामुळे रुग्णांना खर्च करावा लागत आहे. गरीब रुग्ण औषधी खरेदी करू शकत नाही. १७ गोळ्याची किंमत १२५० रुपये असल्याने मनपाने औषधी उपलब्ध करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजा हांडा यांनी केली आहे.