दंदे फाऊंडेशनचा उपक्रम : साने गुरुजी उर्दू शाळेत आरोग्य शिबिरनागपूर : हृदय रोगापासून ते कॅन्सरच्या तपासणीपर्यंतची नि:शुल्क सोय उपलब्ध करून देण्यात आल्याने शुक्रवारी २०० रुग्णांनी याचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, यात कॅन्सरचे २२ रुग्ण आढळून आले. त्यांना समोरील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कायदा मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा, केंद्रीय पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री निहालचंद मेघवाल, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे यांनी भेट देऊन या समाजसेवी कार्याचे कौतुक केले. डॉ. दंदे फाऊंडेशन आणि डॉ. दंदे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त महाल तुळशीबाग रोड रहातेकरवाडी येथील साने गुरुजी उर्दू शाळेत मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. पिनाक दंदे यांच्या नेतृत्वातील या शिबिरात ३० तज्ज्ञ डॉक्टरांसह १०० रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी रुग्णांना सेवा दिली. शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, जनरल सर्जरी, मेंदुरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कर्करोग, नाक कान घसा, स्त्री रोग, जनरल मेडिसीन, त्वचा व गुप्तरोग, मनोविकार, श्वसन विकार व क्षयरोग, ग्रंथीचे विकार अशा विविध विभागातील २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिवाय सोनोग्राफी, ईसीजी आदींची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. शिबिरात कॅन्सर व जनरल सर्जरीचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. या शिबिरात रुग्णांना डॉ. पिनाक दंदे यांच्यासह डॉ. गिरीश देशपांडे, डॉ. जयश्री तिमाने, डॉ. हरी गुप्ता, डॉ. पुष्कराज गडकरी, डॉ. प्रवीण भिंगारे, डॉ. नरेश राव, डॉ. सुनील सोलंकी, डॉ. सीमा दंदे, डॉ. रागिणी मंडलिक, डॉ. वैशाली चांगुले, डॉ. शशिकांत रघुवंशी, डॉ. सत्यजीत जगताप, डॉ. सिद्धार्थ जगताप, डॉ. देवेंद्र मोहरे, डॉ. भाग्यश्री भोकारे, डॉ. लोकेश जप्पा, डॉ. परिक्षित जानी, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. अविनाश जोशी, डॉ. मनोज व्यवहारे व डॉ. अमित पसारी आदींनी आपली सेवा दिली. शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. दंदे फाऊंडेशनचे ट्रस्टी भास्कर लोंढे व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
२००वर रुग्णांची तपासणी
By admin | Published: May 28, 2016 2:55 AM