सुमेध वाघमारे, संजय लचुरिया
नागपूर : वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक धक्का लागून ऑक्सिजनची मोठी पासपलाइन फुटली. प्रसंगावधान राखून तातडीने काम थांबविल्याने व ऑक्सिजन बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र ऑक्सिजनवरील रुग्ण अडचणीत आले होते. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री मेडिकलमध्ये घडली.
मेडिकलच्या अस्थिरोग विभागाच्या वॉर्ड क्र. १ समोरून ऑक्सिजनची मोठी पाइपलाइन छताच्या भिंतीला लागून गेली आहे. या लाइनमधूनच वॉर्डावॉर्डांत ऑक्सिजनचा पुरवठा होतो. एका खासगी कंपनीकडून छोट्या ऑक्सिजन पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास पाइपलाइनच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना मोठ्या ऑक्सिजनच्या पाइपला धक्का बसला. ऑक्सिजनची गळती होऊ लागली. कर्मचाऱ्याने लागलीच वेल्डिंगचे काम बंद केले. ऑक्सिजन पुरवठाही खंडित केला. यामुळे मोठा अनर्थ टळला; परंतु ऑक्सिजन पाइपलासनवर असलेले रुग्ण अडचणीत आले.
रुग्णांना लावले ऑक्सिजन सिलिंडर
ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. ऑक्सिजन पाइपलाइनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर लावण्यात आले. त्यानंतर या रुग्णांना वॉर्ड क्र. ५२ मध्ये स्थानांतरित करण्यात आले. जवळपास १५ ते २० रुग्णांना या वॉर्डात हलविण्यात आल्याची माहिती आहे. तासभराच्या दुरुस्तीनंतर पुन्हा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला. संबंधित कंपनीचे हे कर्मचारी योग्य प्रशिक्षण प्राप्त नसल्याने अशीच घटना यापूर्वीही घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
-सर्व रुग्ण सुखरूप
काम सुरू असताना ऑक्सिजनच्या पाइपलाइनला धक्का लागल्याने गळती सुरू झाली होती; परंतु तातडीने ती दुरुस्ती करण्यात आली. रुग्णांना कुठलाही धोका झाला नाही. सर्व रुग्ण सुखरूप आहेत.
-डॉ. अतुल राजकोंडावार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल