सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या उपचारात प्रभावी असलेले रेमडेसेवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) नकार दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘कोविड’ निधीतून हे इंजेक्शन खरेदी केले जात आहे. परंतु निधी मिळण्यास दोन ते तीन महिन्याचा उशीर होत असल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. मेडिकलमध्ये मागील काही दिवसापासून रेमडेसेवीर इंजेक्शन नव्हते. अखेर आज स्थानिक पातळीवर ५०० इंजेक्शनची खरेदी करण्यात आली आहे. परंतु रुग्णसंख्या पाहता मोठ्या साठ्याची गरज आहे.
मागील वर्षी कोरोनाचे रुग्ण वाढताच रेमडेसेवीर इंजेक्शनच्या मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत आली होती. शहरातील अनेक रुग्णालयांना या औषधाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले होते. रुग्णांच्या नातेवाईकांवर वेळेवर धावाधाव करण्याची वेळ आली होती. काळाबाजार फोफावला होता. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन औषधांचे उत्पादक व वितरकांशी समन्वय साधून मागणी, पुरवठा व वापर यावर लक्ष ठेवू लागले. यामुळे काही प्रमाणात काळ्याबाजारावर वचक बसला. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली. रेमडेसेवीरच्या मागणीत घट आली. किमतीही घसरल्या. परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण वाढल्याने व आता रोज दोन हजारांवर रुग्णसंख्या जात असल्याने शासकीयसह खासगी हॉस्पिटलच्या खाटा गंभीर रुग्णाने भरू लागल्या आहेत. सोबतच रेमडेसेवीर इंजेक्शनच्या मागणीतही पुन्हा वाढ झाली आहे. याच दरम्यान आता ‘डीएमईआर’ने या औषधाच्या पुरवठ्यासाठी हात वर केल्याची माहिती आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी मिळणाऱ्या निधीतून हे इंजेक्शन खरेदी केले जात आहे. परंतु सरकारी काम आणि महिनो न् महिने थांब असा काहीसा प्रकार सुरू असल्याने वेळेवर निधी मिळत नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. याचा फटका कोरोनाच्या गंभीर रुग्णांना बसत आहे. मागील काही दिवसांपासून मेडिकलमध्ये हे इंजेक्शन नसल्याचे स्वत: रुग्णांच्या तक्रारी आहेत.
- लालफितशाहीच्या आड निधीची अडवणूक
शासकीय रुग्णालयामध्ये कोरोनाच्या उपचारात आता महागडे टॉसीलिझूमॅब इंजेक्शन वापरणे बंद केले आहे. प्राप्त माहितीनुसार, मेडिकल प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केलेल्या औषधांच्या प्रस्तावात पूर्वी नऊ लाख किमतीचे हे इंजेक्शन होते. त्याऐवजी रेमडेसेवीर इंजेक्शन देण्याची मागणी केली. परंतु कार्यालय लालफितशाहीच्या आड नवा प्रस्ताव तयार करण्यास मेडिकलला सांगितले आहे. यामुळे निधीसाठी आणखी काही महिन्याची प्रतीक्षा आली आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोनाच्या नव्या ४०० खाटांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून औषधांची खरेदी होत असल्याने ती हजार रुग्णांसाठी कशी पुरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- मेडिकलमध्ये पुरवठ्यात अडचणी
प्राप्त माहितीनुसार, मेडिकल प्रशासनाने काही दिवसांपूर्वी तीन पुरवठादारांना प्रति दोन हजार रुपयाप्रमाणे प्रत्येकी एक-एक हजार असे तीन हजार रेमडेसेवीर इंजेक्शनची ऑर्डर दिली होती. परंतु यातील एका कंपनीने हे दोन हजाराचे रेमडेसेवीर एक हजारात देण्याचे पत्र मेडिकलला दिले. यामुळे मेडिकलने जुनी ऑर्डर रद्द करून उर्वरित दोन्ही कंपनीला एक हजारात रेमडेसेवीर देण्याची मागणी केली आहे. अद्याप या कंपनीकडून कुठलेही उत्तर आले नसल्याने पुरवठा खोळंबल्याची माहिती आहे.
- स्थानिक पातळीवर ५०० इंजेक्शनची खरेदी
कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसेवीर आवश्यक आहे. अखेर मंगळवारी मेडिकल प्रशासनाने स्थानिक पातळीवर ५०० इंजेक्शनची खरेदी केली. परंतु वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रेमडेसेवीरचा मोठा साठा असणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: यात लक्ष घालणे गरजेचे असल्याचे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
- एका रुग्णाला लागतात सहा इंजेक्शन
कोरोनाची गुंतागुत होऊन गंभीर झालेल्या एका रुग्णाला साधारण सहा रेमडेसेवीर इंजेक्शन दिले जाते. पहिल्या दिवशी दोन इंजेक्शन आणि नंतर तीन दिवसात एक-एक इंजेक्शन दिले जाते.
- काय आहे बाजाराची स्थिती
महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे सदस्य हरीश गणेशानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, केमिस्टकडे रेमडेसेवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. आवश्यक प्रमाणात विविध कंपन्यांचे हे इंजेक्शन उपलब्ध आहे. किमतीही कमी झाल्या आहेत.