लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक कहर एप्रिल महिन्यात दिसून आला. परंतु मे महिन्याला सुरुवात होताच दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे होत असल्याचे चित्र होते. परिणामी, मागील महिन्यात जेथे ६६,७१८ नव्या रुग्णांची भर पडली, तेथे दुपटीने म्हणजे, १,३५,७४९ रुग्ण बरे झाले. ३० एप्रिल रोजी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७९.३८ टक्के होते, ३१ मे रोजी यात वाढ होऊन ते ९६.८१ टक्क्यांवर पोहोचले. महिन्याभरात या दरात १७.५३ टक्क्याने वाढ झाली. संसर्गाचे प्रमाण १२.७४ टक्के झाले आहे. एप्रिलमध्ये हाच दर २७.८९ टक्के होता.
नागपूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. कडक निर्बंध व लोकांकडून कोरोना नियमांचे पालन होत असल्याने त्याचा फायदा होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. नागपुरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला मार्च २०२० पासून सुरुवात झाली. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील तीन महिन्यांची तुलना केल्यास, दुसऱ्या लाटेतील तीन महिन्यातच सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला होता. ४८४५७ नवे रुग्ण, तर १४०६ मृत्यूची नोंद झाली होती. त्या तुलनेत मे महिन्यात रुग्ण व मृत्यूची संख्या ओसरताना दिसून येत असताना, ६६,८१८ रुग्ण व १५१४ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
दुसऱ्या लाटेचा मोठा फटका ग्रामीणलाही बसला
नागपूर ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्ण व मृत्यूची संख्या मोठी आहे. परंतु शहरापेक्षा ग्रामीण भागात ५० टक्क्यांपेक्षा कमी नमुन्यांची तपासणी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मे महिन्यात ग्रामीण भागात रुग्ण व मृत्यूची संख्या वाढली आहे. मागील महिन्यात शहरात ३६७५४ रुग्ण व ७६३ मृत्यू, तर ग्रामीण भागात २९,७४८ रुग्ण व ४३५ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
पहिली लाट...
महिना : पॉझिटिव्ह नमुने: संक्रमणाचा दर : मृत्यू
ऑगस्ट : १७५३१७ : १३.७८ : ९१९
सप्टेंबर : १९६७२२ : २४.६३ : १४०६
ऑक्टोबर : १८१३९५ : १३.६५ : ९५२
दुसरी लाट...
महिना : पॉझिटिव्ह नमुने : संक्रमणाचा दर : मृत्यू
मार्च : ३७९१४३ : २०.११ : ७६३
एप्रिल : ६५१६३८ : २७.८९ : २२९०
मे : ५२४२२६ : १२.७४ : १५१४