लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेले संपूर्ण रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना राेज त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आराेप काही रुग्णांच्या नातेेवाइकांनी केला आहे.
रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालय अद्ययावत असून, येथे शहरासाेबतच ग्रामीण भागातील रुग्ण नियमित उपचारासाठी येतात. या रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत शिबिरांचे आयाेजन केले जात असून, टेलिमेडिसीनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयाच्या आवारातील व परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. रस्त्यांवरील डांबर उखडले असून, नुसती बारीक गिट्टीराेडवर पसरली असल्याने रुग्णांना त्यावरून पायी चालणे कठीण झाले आहे.
या रुग्णालयाच्या चारही बाजूंनी डांबरी रस्ते तयार करण्यात आले असून, त्या रस्त्यांचा वापर रुग्णालयातील विविध वाॅर्डमध्ये जाण्यासाठी केला जाताे. गर्भवती महिलांना रस्त्यावरून चालताना किंवा वाॅर्डमध्ये नेताना त्रास सहन करावा लागताे. येथील काही रस्ते दुरुस्तीअभावी तर काही रस्ते उतार असल्याने पावसामुळे खराब झाले आहेत. डांबरीराेड वारंवार खराब हाेत असल्याने या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी मागणीही रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीय व इतर नागरिकांनी केली आहे.
...
डुकरांचा वावर
या रुग्णालयाच्या आवारात डुकरांचा वावर वाढला आहे. त्या डुकरांचा बंदाेबस्त करण्यासाठी रुग्णालयाच्या उत्तरेकडील भागाला सुरक्षा भिंतीचे बांधकाम करणे गरजेचे आहे. सुरक्षा भिंतीअभावी त्या भागातून डुकरे रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करतात. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्राद्वारे कळवले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रकाश उजगरे यांनी दिली. दुसरीकडे, या रस्त्यांचा दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुनील दमाहे यांनी दिली.