लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - देशाचा केंद्रबिंदू , संत्र्याचे शहर (ऑरेंज सिटी) म्हणून ओळख असलेल्या नागपूरने गुन्हेगारीत महाराष्ट्रात पहिल्या तर देशात दुसऱ्या स्थानावर नाव नोंदवले आहे. बिहारच्या पाटणा शहराशी नागपूरच्या गुन्हेगारांची स्पर्धा सुरू असल्याचा धक्कादायक अहवाल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो - २०१९ च्या अहवालात जाहीर झाला आहे.
वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह झपाट्याने विकासाची घोडदाैड करणाऱ्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचाही ग्राफ चढत असल्याचे चित्र आहे. नुकताच एनसीआरबीने गुन्हेगारीने ग्रस्त असलेल्या देशातील २० महानगरांचा अहवाल जाहीर केला. त्यात पटणा (बिहार) पहिल्या तर नागपूर (महाराष्ट्र) दुसऱ्या स्थानावर असल्याचे नमूद केले आहे. २०१९ च्या या अहवालानुसार बिहारची राजधानी पटणा येथे प्रति एक लाख लोकसंख्येमागे हत्या होण्याचे प्रमाण ४.७ तर नागपूरचे प्रमाण ३.६ असल्याचे नमूद केले आहे. देशाची राजधानी दिल्लीचे प्रमाण ३.१ तर जयपूर (राजस्थान)चे प्रमाण ३.० तर लखनौ (उत्तर प्रदेश)चे प्रमाण २.६ नोंदवले आहे.
महाराष्ट्राचा आढावा सादर करताना देशात गुन्हेगारीमध्ये पुणे १३ व्या स्थानी (१.५) तर देशातील बेस्ट पुलिसिंगचा गाैरव मिळविणारे मुंबई १९ व्या स्थानावर आहे. येथे हत्येचे प्रमाण प्रति लाख लोकसंख्येमागे ०.९ एवढे आहे.
यापूर्वीच्या फडणवीस सरकारच्या कालावधीत राज्याचे गृहमंत्रिपद नागपूरनेच पूर्णवेळ सांभाळले तर आताही ठाकरे सरकारच्या कालावधीत गृहमंत्रिपद नागपूरच्याच वाट्याला आहे. तरीसुद्धा गुन्हेगारीच्या बाबतीत नागपूरची बिहार (पटणा) शी तुलना होत असल्याने चर्चेसोबत चिंताही व्यक्त केली जात आहे.
लवकरच दिसेल ॲक्शन प्लॅनचा परिणाम
विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात नागपूर पोलीस गुन्हेगारी निपटून काढण्यासाठी कमालीचे आक्रमक झाले आहे. यापूर्वीचे आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी तसेच विद्यमान पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही गुन्हेगारी निखंदून काढण्यासाठी अनेक कठोर उपाययोजना अमलात आणल्या आहेत. सध्याचे पोलीस आयुक्तांनी अनेक बड्या गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी एक ॲक्शन प्लॅनच तयार केला आहे. गेल्या आठवड्यात लोकमतशी विशेष चर्चा करताना त्यांनी त्याबाबत वाच्यताही केलेली आहे. पुढच्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा आहे.