नागपूर : तीन सदस्यीय प्रभाग पद्धती नको, दोन सदस्यांचा प्रभाग हवा, असा ठराव प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत घेऊन मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा विरोध केल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या मुद्यावर बॅकफूटवर आलेले आहेत. आता सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्याला आम्ही लोकशाही पद्धतीने लोकांसमोर जाऊन विरोध करू, असे सांगत मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलणार नाही, असे पटोले यांनी मंगळवारी नागपुरात स्पष्ट केले. (Patole on the backfoot from the ward method)
प्रदेश काँग्रेसने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा विरोध केल्यानंतर विविध शहर काँग्रेसनेही तसे ठराव घेण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसमधून प्रभाग पद्धतीला विरोध वाढेल व सरकारवर दबाव निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, पटोले यांनी नागपुरात केलेल्या वक्तव्यावरून सरकार आपला निर्णय बदलणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पटोले म्हणाले, आम्ही महापालिका क्षेत्रात राहणारे लोकप्रतिनिधी व जनतेच्या समस्या मांडल्या होत्या. त्या आधारे तीन सदस्यीय प्रभाग रद्द करावे, अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र, आता सरकारने निर्णय घेतलेला आहे. सरकार आणि संघटन वेगवेगळे असतात. आम्ही संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.