नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार बदलण्यासाठी दोेन मंत्री प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर दबाव टाकतात व प्रदेशाध्यक्षांसमोर नतमस्तक होतात. अ. भा. काँग्रेस समितीने दिलेला उमेदवार मतदानाच्या १२ तासांपूर्वी बदलला जातो. असे हतबल प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला कसा काय न्याय देतील, असा चिमटा काढत पटोले यांनी आजच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केला.
बावनकुळे म्हणाले, आपल्या विरोधात रिंगणात असलेले दोन्ही उमेदवार हे स्पर्धेत नव्हते. काँग्रेसने उमेदवार बदलून समर्थन दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या सहा नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत. याकडे काँग्रेसने कसे दुर्लक्ष केले.
दोन मंत्री हे दाखवित होते, की आम्ही प्रदेशाध्यक्षाला किती हतबल केले आहे. उमेदवार बदलेपर्यंत मंत्री प्रचाराला लागले नाहीत. राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते हे चित्र पाहून नाराज होत होते. काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासात असे घडले नाही.
नामुष्की ओढवलेले, हतबल झालेले प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला मोठ्या यशापासून कुणी रोखू शकणार नाही. काँग्रेसने दोन वर्षांत कमावलेले सर्वस्व या निवडणुकीत गमावले आहे. नागपूरसह राज्यभर काँग्रेसचे हसू झाले आहे. त्यामुळे पटोले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
महाविकास आघाडी किती फुटली ते निकालानंतर दिसेल
- भाजपकडे हक्काची ३१८ मते आहेत. आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर
३३२ मतदारांनी मला मत देण्यासाठी संमती दर्शविली. त्यामुळे निवडणुकीची चिंता नव्हती. भाजपचे एकही मत फुटणार नाही. मात्र, काँग्रेससह महाविकास आघाडीत किती खिंडार पडली हे निकालानंतर दिसेल, असा दावाही बावनकुळे यांनी केला.