राजीनाम्यानंतरही जुन्याच अध्यक्षांकडे कारभार राहण्याचे पटोलेंचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 07:44 PM2022-06-04T19:44:38+5:302022-06-04T19:47:30+5:30
Nagpur News नवीन अध्यक्ष नेमायचा की नाही की निवडणुकीपर्यंत जुन्याच अध्यक्षांना कायम ठेवायचे, याबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी सांगितले.
नागपूर : काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरात घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शिर्डीच्या नवसंकल्प शिबिरात घेण्यात आला. राज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राज्यात असलेल्या ५१ जणांचा राजीनामा झाला; पण आता आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या काळात नवीन अध्यक्ष नेमायचा की नाही की निवडणुकीपर्यंत जुन्याच अध्यक्षांना कायम ठेवायचे, याबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी सांगितले. यामुळे आता पुन्हा काही दिवस जुन्याच अध्यक्षांकडे कारभार राहील, हे स्पष्ट झाले आहे.
जातीनिहाय जनगणना व्हावी
- ओबीसींचा इम्पेरिकल डाटा गोळा करण्याला वेग आला, काँग्रेसकडून सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू आहे. राज्यातही जातनिहाय जनगणना व्हावी, यामुळे बहुजन समाजाला न्याय मिळेल. विकासाची काही कामे थांबली तरी चालेल पण आधी जातनिहाय जनगणना करा.
हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीसोबतच राहतील
- बहुजन आघाडीसह सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी मुख्यमंत्री आणि आमचे नेते बाळासाहेब थोरात चर्चा करत आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला पाठिंबा दिल्याच्या चर्चा ऐकल्या; मात्र आमचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील व वेळेच्या आत त्याचे मतपरिवर्तन करण्यात महाविकास आघाडीला यश येईल.
गांधी परिवाराला हात लावला तर जेलभरो
- रुपयाच्या मूल्यात घसरण होत आहे. महागाई वाढत आहे. सरकार आपले अपयश झाकण्यासाठी गांधी परिवाराला टार्गेट करीत आहे. देशातला काँग्रेस कार्यकर्ता समर्थ आहे. गांधी परिवाराला हात लावला तर देशभरात जेलभरो करू. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल.
नैसर्गिक आपत्तीत निवडणुका मागे पुढे होतात
- समजा कोरोना वाढला तर निवडणूक आयोग त्याबाबत निर्णय घेऊ शकतो. निवडणुकीचा कालावधी असा निश्चित नसतो. एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर निवडणुका मागेपुढे करण्यात आली आहे. याच्या बद्दल काही अपडेट असतील तर मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार निवडणूक आयोगाकडे देतील व आयोग निर्णय घेईल.