चव्हाणांना घेरण्यासाठी पटोलेंचे प्रोजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:40 AM2018-08-31T00:40:02+5:302018-08-31T00:41:18+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात पक्षांतर्गत दबाव गट निर्माण करण्यासाठी विदर्भातील चव्हाण विरोधकांनी माजी खासदार नाना पटोले यांना समोर करून रणनीती आखली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांचा नागपुरात सत्कार आयोजित करून पटोले यांना प्रोजेक्ट करण्याची योजना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात पक्षांतर्गत दबाव गट निर्माण करण्यासाठी विदर्भातील चव्हाण विरोधकांनी माजी खासदार नाना पटोले यांना समोर करून रणनीती आखली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांचा नागपुरात सत्कार आयोजित करून पटोले यांना प्रोजेक्ट करण्याची योजना आहे. विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्यात चव्हाण समर्थक मानल्या जाणाऱ्या माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शनासाठी होत असलेला हा सोहळा काँग्रेसला आणखी कमजोर करण्याची शक्यता आहे.
पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे विजयी झाले. आता त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने १ सप्टेंबर रोजी बहुजन विचार मंचच्या बॅनरखाली नागपुरात हा मेळावा होत आहे. विशेष म्हणजे भंडारा-गोंदियाच्या निवडणूक प्रचारात अशोक चव्हाण आलेच नव्हते. यावरून पटोले समर्थकांनी नाराजीही व्यक्त केली होती. आता कुकडेंच्या सत्काराच्या आडून चव्हाण यांच्यावर नेम साधण्याची तयारी पटोले यांनी चालविल्याची पक्षात चर्चा आहे. पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यापासून ते प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. विदर्भातील चव्हाण विरोधकांनी यासाठी पटोलेंना बळ देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, चव्हाण दिल्लीत भारी पडले व पटोलेंना उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. आता चव्हाण विरोधी नेते या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. निमंत्रण पत्रिकेत आ. विजय वडेट्टीवार, वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, डॉ. बबनराव तायवाडे, माजी आमदार सेवक वाघाये, रवींद्र दरेकर, सुरेश भोयर आदींचीही नावे आहेत. ही नेतेमंडळी चव्हाण विरोधी किनार असलेल्या या कार्यक्रमात सहभागी होतात का, याकडे चव्हाण समर्थक बारीक लक्ष ठेवून आहेत.
मुत्तेमवारांवर कुरघोडीचा डाव
नाना पटोले हे नागपूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत. भंडारा-गोंदियाच्या निकालानंतर त्यांनी गडकरींविरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. यामुळे मुत्तेमवार विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, ते पटोले यांना पाठबळ देण्यासाठी सरसावले आहेत. नागपुरातील पक्षसंघटना विकास ठाकरेंच्या हाती आहे तर पटोले वरून एन्ट्री घेण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे पुढील काळात पटोले विरुद्ध मुत्तेमवार अशी गटबाजी वाढून पक्षांतर्गत मतभेद वाढण्याची चिन्हे आहेत.
राहुल गांधींच्या सूचनेकडेही दुर्लक्ष
-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या नवनियुक्त सरचिटणीसांची बैठक घेत गटबाजी होईल असे काहीही करू नये, असा सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे यांनीही राज्यातील नेत्यांची मुंबईत बैठक घेत कान टोचले होते. असे असतानाही पटोले यांच्याकडून होत असलेले हे शक्तिप्रदर्शन कितपत योग्य, असा सवाल पक्षांतर्गत विचारला जात आहे.