- पॉलिटिकल वॉर
कमलेश वानखेडे
नागपूर : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहचलेल्या नाना पटोले यांच्या वाटचालीत नागपूरची ‘पॉलिटिकल पिच’ महत्त्वाची राहिली. पटोले यांनी गेल्यावेळी नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोेधात लोकसभेची निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. आता त्याच नागपूर शहरात वर्षभराने महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीला नियंत्रणात ठेवून गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत असलेली भाजपची राजवट बदलण्याचे खरे आव्हान पटोले यांच्यासमोर आहे. त्यामुळे पटोलेंची पहिली ‘टेस्ट’ महापालिका निवडणुकीतच होणार आहे.
नाना पटोले यांची आक्रमक नेते म्हणून ओळख आहे. लोकसभेत नागपूरच्या रणभूमीत पाय ठेवल्यामुळे पटोलेंना एक वेगळीच राजकीय उंची मिळाली. लोकसभेत काँग्रेसच्या सर्वच गटांनी त्यांना साथ दिली होती. त्यामुळे नागपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. अशात राष्ट्रवादी व शिवसेनेसारख्या मित्रपक्षांकडून असलेला धोकाही कमी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात पाय रोवण्यासाठी ताकद लावली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापालिका निवडणुकीसाठी ‘सिंचन’ करण्याची तयारी दर्शवत ‘इनकमिंग’ही सुरू केले. पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारही रविवारी दाखल होऊन पक्षप्रवेश करवून घेणार आहेत. दोन्ही पक्षांचा जुना इतिहास पाहता नागपुरात आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे अधिक आहेत. काँग्रेसचे माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र आ. दुष्यंत चतुर्वेदी यांनी नागपुरात शिवसेनेचा धनुष्य उचलला आहे. काँग्रेसमधील सतीशबाबूंच्या निष्ठावानांची फळी सोबत घेत त्यांनी काँग्रेसवरच ‘बाण’ ताणला आहे. येत्या काळात दुष्यंत यांनी आणखी काँग्रेसला खिंडार लावू नये, यासाठीही पटोले यांना वेळीच सावध होऊन योजना आखावी लागणार आहे.
गटबाजीची शाई अजून सुकली नाही
- महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत मुत्तेमवार-ठाकरे विरुद्ध राऊत-चतुर्वेदी अशी गटबाजी रंगली होती. यातूनच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर पूर्व नागपुरातील सभेत शाई फेकण्याचा प्रकार घडला होता.
- अजूनही गटबाजीची शाई पूर्णपणे सुकलेली नाही. याचा प्रत्यय नुकताच काँग्रेसच्या स्थापना दिनी आला.
- आता राऊत हे ऊर्जामंत्री व पालकमंत्री असल्याने त्यांचेही हात जबाबदाऱ्यांनी बांधले आहेत. तर आ. विकास ठाकरे यांच्याही संघटन क्षमतेचे या निवडणुकीत एकप्रकारे ‘ऑडिट’ होणार आहे.
- शिवाय पटोले नागपुरातून लढले असल्यामुळे त्यांना गटतट, कार्यकर्ता यांची चांगली ओळख आहे. त्यामुळे कुणाकडूनही गटबाजीला खतपाणी घातले जाऊ नये, याची काळजी घेऊन संबंधितांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रेशरही पटोले यांच्यावर असेल.