नागपूर : समुद्रावरील गस्ती दलाप्रमाणे तलावातही गस्तीनौका तैनात करण्यासाठी फुटाळा तलावात प्रायोगिक तत्त्वावर गस्ती नौका तैनात करण्यात आली आहे. या प्रकारचा प्रयोग राज्यातील सर्व मालगुजारी तलावावर करण्यात येणार आहे. त्यामुळे मत्स्य चोरीला आळा बसणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
राज्यातील गोड्या पाण्याच्या तलावात मत्स्य निर्मिती करण्यासाठी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांशी करार करण्यात येतो. अशा तलावात चोरटी मासेमारी होऊ नये, यासाठी गस्ती नौका तैनात करण्यात आली आहे. या गस्ती नौकेद्वारे पाहणी करताना केंदार बोलत होते.
या गस्तीनौकेचा उपयोग मत्स्यसंवर्धनासाठी होऊन त्यांच्यावर येणारे विविध रोगावर उपाययोजनांसाठी मदत होणार आहे. तसेच केज कल्चर राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील तलावातही अशाच प्रकारच्या गस्ती नौका तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार विकास ठाकरे, अनिल वडपल्लीवार, पंचशील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, जिल्हा मजदूर संघाचे अध्यक्ष स्वप्नील लिखार, दिपक चव्हाण, नगर सेवक कमलेश चौधरी, शैलेंद्र अवस्थी, मुकेश चौधरी, राजा गोपाले उपस्थित होते.