राकेश घानोडे, नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने टेंडरविरुद्धची याचिका फेटाळून लावल्यामुळे अमरावतीमधील २२ चौकांच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला. संबंधित कामे ५ कोटी ८५ लाख ८३ हजार २३० रुपयाची आहेत. न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व उर्मिला जोशी यांनी हा दिलासादायक निर्णय दिला.
महानगरपालिकेने कामाचा खर्च वाचविणे, कामे वेळेत पूर्ण करणे, क्षमताधारक कंत्राटदार नियुक्त करणे, कामांच्या स्वरुपात समानता ठेवणे इत्यादी उद्देशातून चौक साैंदर्यीकरणासाठी ड्रेनेज, सिमेंट रोड, पेविंग ब्लॉक्स इत्यादी ३७ कामे एकत्र केली व त्याचे कंत्राट वाटप करण्यासाठी १८ ऑक्टोबर रोजी टेंडर नोटीस जारी केली. त्यावर इंद्रापुरी कॉन्ट्रॅक्टर सोशल वेलफेयर मल्टिपर्पज असोसिएशनचा आक्षेप होता. त्यामुळे असोसिएशनने ही याचिका दाखल केली होती. १९ सप्टेंबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या स्वरुपाची कामे एकत्र करता येत नाही, असे असोसिएशनचे म्हणणे हाेते. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता संबंधित शासन निर्णय विकास कामांना एकत्र करण्यास प्रतिबंध करीत नाही, असे स्पष्ट केले. तसेच, कामे एकत्र केल्यामुळे महानगरपालिकेचा खर्च कमी होईल व कामांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल, याकडे लक्ष वेधले. महानगरपालिकेतर्फे ॲड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.