नागपूर : कर्नाटक येथील तीन आरोपींनी नागपुरातील धान्य व्यापाऱ्याची पावणे एकतीस लाखांनी फसवणूक केली. त्यांनी तांदूळ विकत घेतला व पैसे देण्याऐवजी व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
ललित गणेश राजपूत (४८) यांचे एस.आर.एन्टरप्रायझेस नावाचे दुकान आहे. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना कर्नाटकमधून तीन व्यापाऱ्यांनी संपर्क केला. राघव स्वामी (गंगावती, बंगळुरू, कर्नाटक) याने अनिल राईस सोल्युशन व सूर्या एजन्सीच्या गोवर्धन मॅथ्युज (बंगळुरू) यांना तांदूळ हवा असल्याची बतावणी केली. त्याने ३० लाख ७५ हजारांचा माल मागवला. पैसे लगेच पाठवतो असेदेखील आरोपी म्हणाले. मात्र त्यांनी पैसे पाठवलेच नाही. राजपूत यांनी पैशांबाबत विचारणा केली असता आरोपींनी टाळाटाळ केली व त्यानंतर शिवीगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिली. अखेर राजपूत यांनी गणेशेपठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे व आरोपींचा शोध सुरू आहे.