पूर्व नागपूरवरून काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर पवार गटाचा संताप
By कमलेश वानखेडे | Published: October 19, 2024 05:43 PM2024-10-19T17:43:33+5:302024-10-19T17:44:55+5:30
Nagpur : उद्या काँग्रेसला तिकीट मिळाली तर राष्ट्रवादीची गरज पडणार नाही का ?
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपूरच्या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये रस्सीखेच सुरू आहे. शुक्रवारी पूर्व नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी बैठक घेत ‘सांगली पॅटर्न’चा इशारा दिला होता. शनिवारी शरद पवार गटाने पूर्व नागपुरात बैठक घेत काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. उद्या काँग्रेसला तिकीट मिळाली तर राष्ट्रवादीची गरज पडणार नाही का, असा थेट सवालही काँग्रेस नेत्यांना करण्यात आला.
पूर्व नागपुरातील विभागीय कार्यालयात शरद पवार गटाची बैठक झाली. तीत शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, विभागीय अध्यक्ष रविनीश पांडे, आकाश थेटे, रविंद्र इटकेलवार, प्रशांत बनकर, अस्वीन झवेरी, कपील आवारे, मोहन गुरुपंच, हेमंत चोरमार, पवन गावंडे, महेश ठाकरे आदी उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली जात असल्यावर आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. १५ वर्षांपासून पूर्व नागपुरात काँग्रेस पराभूत होत आहे. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला. कोणत्या पक्षाला तिकीट द्यायची हे वरिष्ठ नेते ठरवतील. पण काँग्रेस नेत्यांचे असे हेखेखोरपणे वागणे योग्य नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.
वेगवेगळे लढलो तेव्हा काँग्रेस एकही जागा जिंकली नाही
२०१४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळी लढली. तेव्हा काँग्रेसला शहरात एकही जागा जिंकता आली नाही. हा इतिहास काँग्रेस नेत्यांनी जाणून घ्यायला हवा. काँग्रेसला तिकीट मिळत असेल तर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी जोमाने काम करतील. पण काँग्रेसच्या नेत्यांची तारतम्य ठेवून बोलावे. काँग्रेस नेत्यांना वातावरण खराब करून अप्रत्यक्षपणे भाजपला मतदर करायची आहे का, असा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला.