१५ गावांमध्ये पथदिव्याखाली अंधार
उमरेड : मागील काही वर्षांपासून वीज बिलाच्या थकीत रकमेचा भरणा न केल्याने विद्युत वितरण कंपनीने उमरेड तालुक्यातील सुमारे १५ गावांमधील पथदिव्यांची विद्युत खंडित केली. १५ गावांचा पथदिव्याखाली अंधार पसरल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आलेल्यांमध्ये बेला, मकरधोकडा, बोथली, सिर्सी, चनोडा, हिवरा, आपतूर, गावसुत, घोटुर्ली, मांगली, दुधा, उमरा, टेकाडी, हळदगाव, पाचगाव आदी गावांचा समावेश आहे. या संपूर्ण गावांमध्ये पथदिव्यांचे तीन कोटी पाच लाख रुपये बिल थकीत आहे. पूर्वी या रकमेचा भरणा ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून केला जात होता. त्यानंतर १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतला वळता करीत ग्रामपंचायतीने ही रक्कम भरावी, असे शासनाचे निर्देश होते. काही ग्रामपंचायतीने थोड्याफार रकमेचा भरणा केला. त्यानंतर पुन्हा हात वर केले. मार्च २०१८ नंतरच्या बिलाची रक्कम १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करावी, असाही आदेश आला. त्यानंतरही या थकीत रकमेचा भरणा करण्यात आला नाही. अखेरीस विद्युत विभागाने वीज खंडित करण्यासाठी पाऊल उचलले. यापूर्वी असा प्रकार कधीच बघावयास मिळाला नाही. यावर्षीच पथदिव्यांची वीज कापल्या गेली.