नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विजय पवार यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना शनिवारी दुपारी मेडिकलमधून सुट्टी मिळाली. दरम्यान, प्रतापनगर पोलिसांनी त्यांच्यासह दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावून त्यांना रात्री ९ वाजता नागपूरच्या सीमेबाहेर नेऊन सोडले.
बुलडाणा जिल्ह्यातील बजरंग दल आणि भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका प्रमुख असलेल्या पवार यांनी गडकरी यांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी सायंकाळी विषासारखा दिसणारा काळानिळा द्रवपदार्थ असलेली बाटली तोंडाला लावून प्रचंड खळबळ उडवून दिली होती. गडकरींच्या निवासस्थानासमोर पवार यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ आणि वृत्त सर्वत्र वायुवेगाने पसरल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पोलिसांनी पवार यांना तातडीने ताब्यात घेऊन मेडिकलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर मेडिकलच्या वाॅर्ड क्रमांक ३६ मध्ये डॉक्टरांच्या एका विशेष पथकाने तातडीने उपचार केले. पवार यांनी बुरशीनाशक अंशता पिल्यामुळे त्यांना जास्त बाधा झाली नाही. त्यामुळे मेडिकलच्या डॉक्टरांनी त्यांना शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास मेडिकलमधून सुट्टी दिली. त्यानंतर प्रतापनगरच्या पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी पवार तसेच त्यांच्यासोबत या घटनेचा व्हिडीओ बनविणारे सुंदर संचेती या दोघांना प्रतापनगर ठाण्यात आणले. तेथे त्यांना प्रतिबंधक कारवाईचे कलम १५० नुसार नोटीस देण्यात आली. त्यानंतर रात्री ९ वाजता पोलीस ठाण्यातून त्यांच्या वाहनात बसवून नागपूरच्या सीमेबाहेर नेऊन सोडण्यात आले.
पोलिसांकडून समुपदेशन
पवार यांना मेडिकलमधून प्रतापनगर ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी सुमारे साडेतीन तास त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांना पुन्हा असा प्रकार करणार नाही, अशी समज देण्यात आली.
आमरण उपोषण, आंदोलन, इशारे देऊनही हजारो लोकांच्या भावनेशी जुळलेल्या मागणीकडे कुणी लक्ष द्यायला तयार नव्हते. त्यामुळे संबंधित प्रशासनासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यासाठी आपण विषाचा घोट घेतला, अशी प्रतिक्रियावजा माहिती विजय मारोतराव पवार (वय ५१) यांनी प्रतापनगर ठाण्यातून निघाल्यानंतर लोकमतला सांगितली.
दरम्यान, पवार यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती कळताच मेहकर, लोणार येथील अनेक सहकारी नागपुरात पोहोचले. त्यांच्यापैकी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप संचेती यांनी लोकमत कार्यालयात येऊन या घटनेमागची पार्श्वभूमी कथन केली. लोकलढ्याकडे शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करू नये, असे मत त्यांनी मांडले. विजय पवार यांचे सहकारी ॲड. गजानन दामोदर ठाकरे यांनीही पवार यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर ही वेळ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
----