'त्या' ३३० कुटुंबांना पात्रता तपासून अतिरिक्त भरपाई अदा करा; हायकोर्टाचा यवतमाळ वनाधिकाऱ्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 05:38 PM2022-10-08T17:38:13+5:302022-10-08T17:40:56+5:30
यासंदर्भात मारेगाव वन पुनर्वसन संघर्ष समितीने याचिका दाखल केली होती.
नागपूर : टिपेश्वर अभयारण्यांतर्गत येणाऱ्या मारेगाव (वन) येथील ३३० कुटुंबांना पात्रता तपासून १२ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त भरपाई अदा करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षकांना दिला आहे. याकरिता, त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
यासंदर्भात मारेगाव वन पुनर्वसन संघर्ष समितीने याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मारेगाव (वन) येथे एकूण ४१५ कुटुंबे होती. त्यापैकी संबंधित ३३० कुटुंबांना दि. ३ नोव्हेंबर २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार भरपाई देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित ८५ कुटुंबांना १२ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३३० कुटुंबांपेक्षा अधिक भरपाई देण्यात आली. परिणामी, ३३० कुटुंबांनी अतिरिक्त भरपाई मागितली होती. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अनुप ढोरे यांनी बाजू मांडली.