नागपूर: समृद्धी महामार्गावर १ जुले २०२३ रोजी ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने २५ लाख रुपये देण्याची घोषणा करूनही केवळ ५ लाख रुपयेच नुकसान भरपाई दिल्यामुळे पिडीत कुटुंबीयांनी शुक्रवारी संविधान चौकात ‘राम नाम जप’ आंदोलन करून आक्रोश व्यक्त केला. सायंकाळी आंदोलनकर्ते उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे जात असताना त्यांना पोलिसांनी रोखले. रात्री उशीरापर्यंत आंदोलनकर्ते संविधान चौकात ठाण मांडून बसले होते. दरम्यान आंदोलनातील एका ७५ वर्षीय ज्येष्ठाची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा शासनाने केली होती. परंतु या शासनाने केवळ ५ लाख रुपयेच नुकसान भरपाई दिल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी संविधान चौकात ‘राम नाम जप’ आंदोलन केले. उर्वरीत २० लाख रुपये शासनाने त्वरीत द्यावेत, अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करावी आदी मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी वर्धाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील ४४ दिवसांपासून आंदोलन सुरु केले. परंतु शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अखेर आंदोलनकर्त्यांनी उपराजधानीतील संविधान चौकात आंदोलन केले. दिवसभर आंदोलन केल्यानंतर सायंकाळी आंदोलनकर्ते उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखून धरले.
आंदोलनात संजय गुप्ता, रसिका मार्कंडे, अजहर शेख, ओमप्रकाश गांडोळे, मदन वंजारी, मीना वंजारी, कल्पना गुप्ता, निलीमा खोडे, निरु सोमकुवर, अजय जानवे, चंद्रशेखर मडावी, निलीमा तायडे, प्रिया जानवे, परिजा मार्कंडे, सावित्री मडावी, रामदास पोकळे, दिनकर खेलकर, शंकर गोठे, हर्षल पाते, महेश खडसे सहभागी झाले होते. दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे आंदोलनकर्ते चंद्रशेखर मडावी यांनी सांगितले.