दयानंद पाईकराव
नागपूर : नियमाचा भंग केला की वाहतूक पोलीस संबंधित वाहनचालकाला चलन पाठवितात. परंतु, बहुतांश वाहनचालक हे ई-चलन भरतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाहनावरील दंड वाढत जातो. परिणामी त्यांचे वाहन काळ्या यादीत टाकण्यात येते. त्यामुळे महाट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून आपल्या वाहनावर दंड तर नाही ना याची वेळोवेळी खातरजमा करणे गरजेचे आहे.
कोणत्या महिन्यात किती ई चलन
महिना -- केसेस -- दंड (रुपयांत)
जानेवारी -- ७६२५८ -- १७४२७०००
फेब्रुवारी -- ५८६०२ -- १३४३७५०
मार्च -- ६४२२४ -- १४६१६३००
एप्रिल -- ५४१६३ -- ९६३१५००
मे -- ६०१७७ -- ८०६५४००
जून -- ६५२८६ -- ८६६८८५०
जुलै -- ७१९५५ -- ८०४५०००
ऑगस्ट -- ६७२३२ -- ३६७६४५०
सप्टेंबर -- ६६९६६ -- ४३५९६५०
ऑक्टोबर -- ४०९०७ -- २०००१००
(१९ तारखेपर्यंत)
महा ट्रॅफिक ॲप डाऊनलोड केले का ?
महाट्रॅफिक ॲपवर तुमच्या वाहनावर किती चलन आहे याची अचूक माहिती मिळते. त्यासाठी हे ॲप प्रत्येक वाहनचालकाने आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे गरजेचे आहे. अनेकदा आपल्या वाहनावर चलन असल्याची माहितीच वाहनचालकांना नसते. त्यामुळे त्यांचा दंड वाढत जातो आणि त्यांचे वाहन काळ्या यादीत टाकण्यात येते. महाट्रॅफिक ॲपवर गाडीचा नंबर टाकला की आणि चेसीसचे शेवटचे चार क्रमांक टाकल्यास लागलीच तुमच्या वाहनावर किती दंड आहे, याची माहिती मिळते. त्यामुळे महाट्रॅफिक ॲप प्रत्येकाने डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
ई चलन त्वरित भरा
‘ई चलन त्वरित भरणे आवश्यक आहे. ई चलन न भरल्यास नागरिकांचे वाहन काळ्या यादीत टाकण्यात येते. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी ई चलन त्वरित भरून कारवाईपासून बचाव करावा.’
-चिन्मय पंडित, प्रभारी वाहतूक पोलीस उपायुक्त, नागपूर शहर