नागपूर : सामूहिक शेततळ्यामध्ये जीओमेंबरेन अंथरण्याचे काम स्वीकारल्यानंतर सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दोन तक्रारकर्त्या शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी चार लाख रुपयांवर रक्कम अदा करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने गजराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनला दिले. मंचच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हे प्रकरण निकाली काढले.
पंजाब ढवळे व अंबर ढवळे अशी शेतकऱ्यांची नावे असून, ते नागपूर येथील रहिवासी आहेत. त्यांची मौजा-मसोद (कामठी) येथे शेतजमीन आहे. त्यांना राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजनेंतर्गत २९ डिसेंबर २०१७ रोजी सामूहिक शेततळे मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, त्यांनी गजराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनला १ लाख ४५ हजार रुपयांत सामूहिक शेततळ्यामध्ये जीओमेंबरेन अंथरण्याचे काम दिले. हे काम ५ जून २०१९ पूर्वी पूर्ण करायचे होते. परंतु, कॉर्पोरेशनने ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण केले नाही. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यामुळे तक्रारकर्त्यांचे विविध प्रकारचे आर्थिक नुकसान झाले. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये धाव घेतली होती.
-------------
असे आहेत आदेश
१ - तक्रारकर्त्या शेतकऱ्यांचे १ लाख ४५ हजार रुपये १२ टक्के व्याजासह (२७ मे २०१९ पासून) परत करण्यात यावे.
२ - सामूहिक शेततळे खोदकाम करण्याकरिता झालेल्या खर्चापोटी १ लाख ५९ हजार ७०० रुपये नुकसान भरपाई अदा करावी.
३ - कापूस व मूग पिकाच्या नुकसानपोटी ३० हजार रुपये द्यावे.
४ - शारीरिक-मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये अदा करावे.
५ - या आदेशांचे एक महिन्यात पालन करण्यात अपयश आल्यास पुढील कालावधीसाठी रोज २५ रुपये भरपाई देय होईल.