लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना सहा महिन्यापासून मानधन व भत्ते देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. मानधन व भत्ते तातडीने देण्यात यावे, अशी मागणी ग्रामरोजगार सेवकांनी केली असून, बुधवार(दि. १ सप्टेंबर)पासून कामबंद आंदाेलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात सावनेर तालुक्यातील ग्रामराेजगार सेवकांची शुक्रवारी (दि. २७) बैठक पार पडली असून, त्यात या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. शासनाच्या याेजना गावपातळीवर राबविण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली. गाव समृद्ध बजेट तयार करणे, कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, रोजगार देणे, जॉबकार्ड तयार करणे, मजुरांची हजेरी काढणे आदींची जबाबदारी त्यांच्यावर साेपविण्यात आली आहे. या कामासाठी त्यांना दरमहा मानधन व भत्ते दिले जात असल्याचे ग्रामराेजगार सेवकांनी सांगितले.
सहा महिन्यापासून मानधन, प्रोत्साहन भत्ता व अल्पोपहार भत्त्याची रक्कम देण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. ही रक्कम दाेन दिवसात न मिळाल्यास १ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत मानधन व भत्ते मिळत नाही तोपर्यंत शासनाच्या कुठल्याही योजनेच्या कामाला मदत केली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
यावेळी ग्रामराेजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोंडे, सचिव देवेंद्र गाडगे, उपाध्यक्ष चिंतामण कोसकर, भगवान दियेवार, गुणवंता ठाकरे, रणवीर गजभिये, हरीश सोनवणे, लीलाधर कुरमतकर, रेवनाथ देशभ्रतार, किशोर डुमरे, प्रमोद चांदेकर, शीला घ्यार, पूनम चरपे, शिवाजी मोवाडे, अरुण नानवटकर, महेश काळे, दीपक काकडे, अभिजित ठाकरे, लालचंद वाहणे, पवन सावरकर आदी ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.