दयानंद पाईकराव
नागपूर : दिवाळीचा सण सुरू झाला आहे. त्यामुळे तत्काळ तिकीटही मिळणे कठीण झाले आहे. एजंटकडे गेल्यास आणि २०० ते ३०० रुपये अधिक मोजल्यास प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या अवैध एजंटचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
‘लोकमत’ने रेल्वेस्थानक परिसरातील एका खासगी एजंटशी संवाद साधला असता त्याने दिवाळीत सर्वच रेल्वेगाड्यात अधिक पैसे घेऊन कन्फर्म तिकीट मिळत असल्याचे सांगितले. त्यासाठी २०० ते ३०० रुपये अधिक घेण्यात येत असल्याची माहिती दिली. दिवाळीत अनेकजण आपल्या मुलांसह प्रवास करीत असल्यामुळे ते सहज २०० ते ३०० रुपये अधिक देत असल्याचे त्याने सांगितले.
असे काढावे लागते तत्काळ तिकीट?
-तत्काळचे तिकीट आरक्षण खिडकीवरून तसेच ऑनलाईन कुणीही काढू शकतो, परंतु समजा त्रिवेंद्रमवरून १० तारखेला गाडी सुटत असल्यास नागपूरवरून दिल्लीसाठी ८ तारखेला तत्काळचे तिकीट काढावे लागते,परंतु नागपूरवरून सेवाग्राम एक्स्प्रेस १० तारखेला जाणार असल्यास त्या गाडीचे तत्काळ तिकीट ९ तारखेला काढावे लागते. ऑनलाईन आणि आरक्षण खिडकीवरून तिकीट काढण्यासाठी एकच नियम आहे, परंतु काही खासगी एजंट वेगवेगळ्या वेबसाईटवरून तत्काळ तिकीट काढून प्रवाशांची लूट करतात.
आरपीएफ ठेवून आहे नजर
‘दिवाळीत खासगी एजंट सक्रिय होतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने आरक्षण काऊंटर आणि शहरात यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. खासगी एजंट तिकिटांचा काळाबाजार करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.’
-आशुतोष पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, नागपूर विभाग