आनंद डेकाटे
नागपूर: प्रधानमंत्री आवास योजना, शेती व घरकुल पट्टे वाटप योजनांसारख्या शासनाच्या अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत गतीने पोहचवण्यासाठी योग्य नियोजन करा. तसेच जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या दोन योजनांमुळे शेतकऱ्यांना कायमस्वरुपी लाभ मिळणार असल्याने याकडे अधिक लक्ष द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रामटेक येथील उपविभागीय आढावा बैठकीत केले.
रामटेक येथील गंगाभवन येथे आयोजित उपविभागीय स्तरावरील या बैठकीला खासदार कृपाल तुमाने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशिष जायस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभू शुक्ला, माजी आमदार मलिकार्जुन रेड्डी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी सादरीकरण केले. आढावा बैठकीत वाळू व इतर गौण खनिज धोरणाची अंमलबजावणी, अमृत सरोवर अभियान, जलयुक्त शिवार योजना, पी एम किसान प्रगतीचा आढावा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, पाणंद रस्ते, संजय गांधी निराधार अनुदान योजना, वैयक्तिक वन हक्क कायदा व सामूहिक वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, गाव तेथे स्मशानभूमी, टँकर व विहीर अधिग्रहण, सर्वांसाठी घरे, राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन कार्यक्रम, रोजगार हमी योजना, मनरेगा, प्राथमिक आरोग्य, कृषी विभागांतर्गत खरीप हंगाम पेरणी, बियाणे व खताची उपलब्धता, पुरवठा विभागाअंतर्गत अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, सेतू केंद्र, कोतवाल नियुक्ती, पोलीस पाटील नियुक्ती, स्वच्छ भारत मिशन अभियान, शासन आपल्या दारी योजना आदी योजनांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला.