नागपूर : अपघात पीडित व्यावसायिक रामकृष्ण भांगे यांना दोन महिन्यामध्ये १ लाख ७६ हजार ३१४ रुपये भरपाई अदा करा, असा आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणने वाहन चालक रुपेश मोहर्ले व चोलामंडलम विमा कंपनीला दिला. तसेच, भरपाईच्या रकमेवर ६.५ टक्के व्याजही मंजूर केले.
ही घटना १९ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास वर्धा रोडवर घडली. भांगे मोटरसायकलने जात असताना त्यांना मोहर्ले यांनी स्वत:च्या ताब्यातील चारचाकी वाहन भरधाव वेगाने चालवून जोरदार धडक दिली. त्यामुळे भांगे गंभीर जखमी झाले. तसेच, त्यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले. अपघातानंतर त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि भरपाईकरिता न्यायाधिकरणात दावा दाखल केला. भांगे कोळसा व लाकूड विक्रीचा व्यवसाय करून मासिक ३० हजार रुपये कमाई करीत होते. परंतु, अपघातामुळे त्यांना हा व्यवसाय करणे अशक्य झाले. त्यांच्या प्राथमिक उपचारावर ८० हजार रुपये खर्च झाला असून पुढील उपचारावरही मोठा खर्च होणार आहे असे दाव्यात नमूद करण्यात आले होते.