लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला वाहन विम्याचे १८ लाख ५० हजार रुपये ७ टक्के व्याजासह अदा करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिला. हे व्याज ३ एप्रिल २०१८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रार खर्चापोटी २० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली.
आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. सतीश गोयल असे ग्राहकाचे नाव असून, ते गांधीबाग येथील रहिवासी आहेत. त्यांनी १५ मार्च २०१४ ते १४ मार्च २०१५ या कालावधीकरिता नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून ट्रकचा विमा काढला होता. विम्याचे मूल्य १८ लाख ५० हजार रुपये होते. तो ट्रक ८ नाेव्हेंबर २०१४ रोजी सूर्यानगरातील लता मंगेशकर मैदानावरून चोरी गेला. त्यानंतर गोयल यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली व विमा कंपनीलाही ट्रक चोरीची माहिती कळविली. तसेच, विम्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह दावा सादर केला. त्यावर वेळेत निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी, गोयल यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. नॅशनल इन्शुरन्स कंपनीने त्यावर लेखी उत्तर दाखल करून स्वत:च्या समर्थनार्थ विविध मुद्दे मांडले व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. शेवटी आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता, हा निर्णय दिला.