नागपूर : राज्य आणि सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच इंटरनल असेसमेंटच्या आधारे निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक सत्राची फी न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फी वसुलीसाठी सतत फोन येत आहेत. फी न भरल्यास निकाल मिळणार नाही, असा धमकीवजा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पाल्य वर्षभर शाळेला गेला नसल्याने शाळेची फी कशी द्यायची, यासंदर्भात पालकांमध्ये संभ्रम आहे. पण, शाळा पालकांकडून १०० टक्के फी वसुलीवर भर देत आहेत. याबाबत पालक संघटनांनी शिक्षणमंत्री आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पण, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. याच कारणांनी शाळांच्या व्यवस्थापनाने उर्वरित फी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. पालक म्हणाले, फी कशी भरायची, हा प्रश्न आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, तर व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद आहेत. अशावेळी घरची व्यवस्था बघायची, की शाळेची फी भरायची. शाळेकडून फी भरण्यासाठी सतत दबाव टाकण्यात येत आहे.
फी ५० टक्के माफ करा
कोरोना आणि लॉकडाऊनची स्थिती पाहता अनेक पालक संघटनांनी आंदोलन करून ५० टक्के फी माफ करण्याची मागणी केली होती. पण, त्याचे पुढे काहीच झाले नाही. फी माफ केल्यास पालकांवर भार पडणार नाही. लॉकडाऊनमध्ये फी वसूल करणे योग्य नाही. मुलांनी शाळेत न जाता ऑनलाईन शिक्षण घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात पालकांवर फीसाठी दबाव टाकणे योग्य नाही.
एका शाळेचे व्यवस्थापक नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, पालकांची नोकरी आणि व्यवसायाच्या समस्येसह शाळांनाही आर्थिक समस्या आहे. शाळेच्या सुविधा, शिक्षकांचे पगार आणि अन्य देखरेख खर्चासाठी शाळेलाही खर्च येत आहे. अशावेळी पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या फीवर चालते. फी मिळाली नाही तर शाळा चालवायची कशी, शिक्षकांना पगार कसा द्यायचा आणि इतर खर्च कसा करायचा, हासुद्धा गंभीर प्रश्न आहे.
कर्जावर सुरू आहे घरचा खर्च
सीबीएसई शाळेच्या एका विद्यार्थ्याचे पालक सतीश विश्वास म्हणाले, गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे नोकरी गेली आहे. कर्जावर घराचा खर्च सुरू आहे. अशा स्थितीतही मुलाला शिकवायचे आहे. मुलगा वर्षभर शाळेत गेला नाही, तर फी कशी द्यायची, हा प्रश्न आहे. आर्थिक जुळवाजुळव करून मुलाची ५० टक्के फी भरण्यास तयार आहे. शाळेने सूट द्यावी.