लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमी येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे गुरुवारी ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर, महापालिकेचे उपायुक्त राम जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, नगरसेविका वंदना भगत, विलास गजघाटे, यांच्यासह महापालिका तसेच शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दीक्षाभूमी येथे दरवर्षीप्रमाणे बौद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता असून, परिसरात पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, अखंडित वीजपुरवठा,मनपा आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, फिरते स्वच्छतागृह, पुरेशा प्रमाणात पथदिवे, सुरक्षा व्यवस्था, अन्नदान वाटप, आग प्रतिबंधक उपाययोजना, होर्डींग व सूचना फलक, नियंत्रण कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे अशा सुविधा तयार ठेवाव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.देशभरातून येणाऱ्या बौद्ध अनुयायांना दीक्षाभूमीकडे जाण्यासाठी मुख्य रेल्वे स्थानक, अजनी रेल्वेस्थानक आणि गणेशपेठ तसेच सीताबर्डी बसस्थानकापासून जागोजागी होर्डींग आणि सूचना फलक लावावेत. तसेच कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी रस्त्यांच्या बांधकामामुळे आणि वाहतुकीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागपूर सिटी बसेसच पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.तसेच कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि परिसराची तात्काळ स्वच्छता करावी. परिसरातील रस्त्यांची डागडुजी आणि वाहनांची संख्या पाहता पर्यायी पार्किंगच्या जागेची सोय करण्याच्या सूचना त्यांनी कामठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुसज्ज रुग्णवाहिका तसेच विविध ठिकाणी मोबाईल स्ट्रेचरची व्यवस्था करावी.पोलीस विभागाने पोलीस नियंत्रण व साहाय्यता कक्ष तयार ठेवावे. आकस्मिक पाऊस, वादळामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दीक्षाभूमी परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 9:07 PM
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमी येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या.
ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिन पूर्वतयारीचा आढावा