लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. ग्रामीण भागात अनेकावर संकट कोसळले. अशात गत दोन वर्षापासून ग्रामपंचायतीचे टॅक्स वसुलीचे कार्य थांबले आहे. याचा फटका गावातील विकास कामांनाही बसतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर स्थिती पूर्वपदावर येत असताना टॅक्स जमा करणाऱ्या ग्रामस्थांना वर्षभर दळण मोफत दळून देण्याचा निर्णय उमरेड तालुक्यातील उदासा ग्रां.प.ने घेतला आहे. याची १ ऑगस्टपासून अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
उमरेडपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या उदासा ७६९ कुटुंबाचे गाव आहे. या ग्रामपंचायतीमध्ये घर आणि पाणी कराची (टॅक्स) एकूण मागणी ३७ लाख १५,२१४ रुपये आहे. यापैकी २२५ कुटुंबीयांनी कराचा भरणा केला असून ९ लाख ३,१२१ रुपये ग्रां.प.च्या तिजोरीत कर स्वरूपात जमा झाले आहे. सध्या ५४४ कुटुंबीयांकडे २८ लाख १२,०९३ रूपयांची थकबाकी आहे.
कोरोना संकटामुळे ही थकबाकी वाढली. अशातच ग्रामपंचायतीची सभा जानेवारी २०२१ ला पार पडली. या सभेत सरपंच कविता दरणे आणि सर्व सदस्यांनी ज्या कुटुंबाने घर आणि पाण्याचे कर अदा केले, त्यांना नि:शुल्क दळण दळून देण्याचा निर्णय घेतला. महिन्यातून तीनदा वर्षभर ही सेवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रदान करावयाची असा ठराव पारित करण्यात आला.
त्यानंतर ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर गावातीलच आटा चक्कीची निविदा काढली. यावर्षीच्या करदात्यांसाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत ही सेवा राहणार असल्याची माहिती कविता दरणे यांनी दिली. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करीत आहोत, गावकऱ्यांचा प्रतिसाद नक्कीच मिळेल, असा आशावाद सचिव शरद सरादे, उपसरपंच विठ्ठल मेश्राम, सदस्य मिलिंद बोरकर, अनिता लोखंडे, ललिता सोनडवले, शर्मिंदा पवार, सुमन शेंडे, सखाराम खिल्लारे, राकेश बावनगडे आदींनी व्यक्त केला.