लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात जिथे अनेक लोक सामाजिक औदार्य दाखवत आहेत, तिथे काही लोकांकडून टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रयत्न सर्रास केले जात आहेत. अशाच प्रकार रामदासपेठेतील सोमलवार शाळेजवळील एका नामांकित हॉस्पिटलकडून केला जात असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला तीन लाख रुपये डिपाॅझिट करा अन्यथा घेऊन जा, असे सांगून अक्षरश: पळवून लावण्यात आले.
धरमपेठेतील अनिल करंडे (६६) यांची ऑक्सिजन लेव्हल अतिशय खालावली असल्याने आणि अन्य त्रास सुरू झाल्याने त्यांचा मुलगा शिशिर करंडे यांनी रामदासपेठेतील नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दाखल करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने आनाकानी करण्यास सुरुवात केली. तीन लाख रुपये रोख रक्कम डिपॉझिट म्हणून जोवर जमा केली जात नाही, तोवर रुग्णाला आत घेणार नाही, असा इशाराच प्रशासनाकडून देण्यात आला. दरम्यान, इतरांच्या मदतीने शिशिर यांनी वडलांना छावनी येथील एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवले. अशा तऱ्हेने देवदूत म्हणवल्या जाणाऱ्या डॉक्टरकडूनच राक्षसी वृत्तीचे दर्शन कोरोना संक्रमणाच्या काळात होत आहे. ही स्थिती शहरातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये अनुभवास येत आहे.
-----------------
वडिलांना दाखल करण्यासाठी मी ५० हजार रुपये तात्काळ भरण्यास तयार होतो आणि उर्वरित रक्कम सकाळपर्यंत देण्याची हमी दिली होती. मात्र, रुग्ण अत्यवस्थ आहे आणि त्यांची गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे, तू तीन लाख भर अन्यथा घरी घेऊन जा, असे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. अखेर ॲड. अभय बांगडे यांच्या मदतीने तात्काळ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये केवळ २० हजार रुपये डिपॉझिटमध्ये वडिलांना उपचारासाठी दाखल करता आले.
- शिशिर करंडे, धरमपेठ
------------------
डॉक्टरांचा हा क्रूरपणा कसा मान्य करावा
डॉक्टर हे देव असतात आणि हॉस्पिटल हे जीवन देणारे केंद्र असतात, असा समज कोरोनाकाळात भ्रमात निघाला आहे. कोरोना संक्रमणावरील उपचाराचे मापदंड सर्वत्र सारखेच असताना एकीकडे तीन लाख आणि दुसरीकडे २० हजार डिपॉझिटमध्ये उपचार केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. रामदासपेठेतील या हॉस्पिटलने अतिशय क्रूर थट्टा चालवली आहे. इतर हॉस्पिटलची स्थितीही हीच आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व इतरांकडे तक्रार करणार आहे.
- ॲड. अभय बांगडे, संस्थापक, सिटिजन्स ॲक्शन गील्ड (सीएजी)
----------------
डॉक्टरांचा फोन स्विच ऑफ
यासंदर्भात रामदासपेठेतील सोमलवार शाळेच्या शेजारी असलेल्या नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता, प्रारंभी तो उचलला गेला नाही. नंतर संबंधित डॉक्टरांनी मोबाइल स्विच ऑफ केला होता.
...............