नागपूर : मयत शेतकऱ्याच्या वारसदारांना अपघात विम्याचे दोन लाख रुपये ९ टक्के व्याजासह अदा करा, असे निर्देश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिले. व्याज १९ सप्टेंबर २०१९ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, वारसदारांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कम कंपनीनेच द्यायची आहे.
या प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यात कसूर झाल्यास पुढील कालावधीसाठी दोन लाख रुपयावर १२ टक्के व्याज लागू होईल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. विलास व अक्षय फटिंग असे वारसदारांचे नाव असून ते आरोली, ता. मौदा येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील किशन फटिंग हे राज्य सरकारच्या शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभाकरिता पात्र होते. त्यांचा ४ नोव्हेंबर २०१८ रोजी शेतातील तलावात तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे वारसदारांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला होता. परंतु, त्यावर वेळेत निर्णय घेण्यात आला नाही. करिता, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय देण्यात आला.
-------------
सेवेत निष्काळजीपणा केला
कंपनीने विमा दावा प्राप्त झाल्यानंतर त्यावर निर्धारित कालावधीत निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु, कंपनीने तसे केले नाही. त्यांनी ग्राहकांना द्यावयाच्या सेवेत निष्काळजीपणा केला. त्यामुळे तक्रारकर्त्यांना शारीरिक-मानसिक त्रास सहन करावा लागला व विमा रकमेसाठी ग्राहक आयोगात धाव घ्यावी लागली असे निरीक्षण या निर्णयात नोंदविण्यात आले. कंपनीने ही तक्रार अपरिपक्व असल्याचे नमूद करून ती फेटाळण्याची मागणी केली होती. कंपनीची ही मागणी निरर्थक ठरवण्यात आली.