उमरेड : सुमारे तीन वर्षांपासून आमच्या शेतजमिनीवर ‘दगड’ गाडून ठेवण्यात आले. नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजचे कामही धडाक्यात सुरू झाले. आता मागील काही वर्षांपासून आमच्या शेतजमीन परिसरात काही ठिकाणी रेल्वेचे खोदकाम सुरू आहे. अशावेळी आमच्या जमिनीला तसेच शेतीलासुद्धा फटका बसत असून, रेल्वेचे खोदकाम करण्यापूर्वी आम्हाला मोबदला देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी पत्रपरिषदेत केली.
परसोडी तसेच नगरपालिकेच्या हद्दीतील शेतजमीन परिसरात बेधडकपणे मोठमोठी यंत्रे टाकली जात आहे. यामुळे उभ्या पिकांचेही नुकसान होत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे, त्यांना माहिती द्या. किती शेतजमीन जाणार, मोबदला किती देणार, ही बाबसुद्धा आम्हास कळविण्यात यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांची आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याकडे आम्ही वारंवार दुखणे मांडले असता फारसे गांभीर्याने घेतल्या गेले नाही, असाही आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. यावेळी शिवजी पटेल, जावेद पठाण, मोहम्मद नासीर, गुलाम मोहम्मद मालाधारी, संजय लाडेकर, सारंग लाडेकर, सलीम पठाण, प्रज्वल लाडेकर, विलास घुमडे, संजय वाघमारे, देवका घोडे, विलास मदनकर आदींची उपस्थिती होती.