लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : तळागाळातील नागरिकांचे जीवनमान उंचवावे यासाठी शासनाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) नागरिकांची यादी तयार करून त्यांच्यासाठी विविध याेजना राबविल्या जातात. या बीपीएल यादीत नरखेड तालुक्यातील तीन हजार नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. यातील ५० टक्के नागरिक श्रीमंत असल्याचे माहिती अधिकारात उघड झाली आहे. या प्रकारामुळे मूळ लाभार्थी शासनाच्या याेजनांपासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे.
काेराेना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात शासनाच्या वतीने बीपीएल यादीतील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून कमी किमतीत मुबलक धान्यपुरवठा करण्यात आला. काहींनी हे धान्य विकून पैसा कमावला तर गरिबांना धान्यच मिळाले नाही. ही बाब लक्षात येताच पप्पू महंत, नरखेड यांनी बीपीएल यादीबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली. या यादीत नरखेड तालुक्यातील तीन हजार नागरिकांचा समावेश असल्याचे तसेच त्यातील ५० टक्के नागरिक श्रीमंत असल्याचे आढळून आले. ही बाब तहसीलदार डी. जी. जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. या प्रकरणाची निरपेक्ष चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणीही डी. जी. जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.
...
व्यावसायिकांसह नाेकरदारांचा समावेश
नरखेड तालुक्यातील बीपीएल यादीत डाॅक्टर, माेठे व्यावसायिक, ५ ते २० एकर शेती असलेले शेतकरी, नाेकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह इतरांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा घाेळ पुराव्यानिशी तहसीलदार डी. जी. जाधव यांच्या लक्षात आणून दिला आहे. मूळ लाभार्थ्यांना या यादीतून वगळण्यात आल्याने ते शासकीय याेजनांच्या लाभांपासून वंचित असल्याचेही त्यांना पटवून देण्यात आले.
...
यासंदर्भात नागरिकांनी आपल्याकडे बाेगस लाभार्थ्यांची यादी व लेखी तक्रार करावी. यादीतील त्या नागरिकांच्या माहितीबाबत यंत्रणेद्वारे खातरजमा केली जाईल. त्यात सत्यता आढळून आल्यास त्यांच्याकडून त्यांनी उचल केलेले बीपीएल धान्य जप्त केले जाईल. शासकीय याेजनांचा लाभ घेतल्यास उचल केलेल्या रकमेची वसुली करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
- डी. जी. जाधव,
तहसीलदार, नरखेड