लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : महाजेनकाेच्या खापरखेडा (ता. सावनेर) येथील वीज केंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटदारांची देयके तीन महिन्यापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणी आले असून, त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन देण्यासाठी पैसा नसल्याने कामगारांच्या वेतनाचीही समस्या ऐरणीवर आली आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने साेडवावी, अशी मागणी खापरखेडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्यावतीने राज्याचे ऊर्जामंत्री, जेनकोचे व्यवस्थापकीय संचालक (संचलन), संचालक (वित्तीय) व खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
वीज केंद्र प्रशासनाने कंत्राटदारांना तीन महिन्यापासून त्यांची देयके दिली नाही. त्यामुळे या देयकांंपाेटी महाजेनकाेकडे काेट्यावधी रुपये थकीत आहेत. बिले रखडल्याने कंत्राटी कामगारांना पुरेसे वेतन देणे शक्य हाेत नसल्याने कंत्राटदारांसाेबतच कंत्राटी कामगार आर्थिक अडचणींना ताेंड देत आहेत. देयके न दिल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर रूप धारण करणार आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे. प्रत्येक कंत्राटाची देयक सादर करताना कंत्राटदाराला जीएसटी, कामगारांचा पीएफ, वेल्फेअर फंड व ईएसआयसीची रक्कम पूर्णपणे भरावी लागते. एकीकडे, महानिर्मितीकडून देयके वेळेवर व पूर्णपणे प्राप्त होत नाही. दुसरीकडे, त्यांना कामगारांचे वेतन व इतर रकमेची कपात नियमित करून द्यावी लागते. अशा स्थितीत कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जीएसटी, पीएफ थकीत राहिल्यास संबंधित विभागाकडूनही कंत्राटदाराला वारंवार पत्र पाठवून विलंब शुल्क भरावा लागतो. त्यामुळे ही समस्या तातडीने साेडविण्याची मागणीही खापरखेडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने केली आहे.
....
कर्जबाजारपण वाढले
यातून मार्ग काढण्यासाठी अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढले आहे. त्यासाठी काहींनी स्थावर संपत्ती तर काहींनी साेन्याचे दागिने गहाण ठेवले आहेत. या काळात कंत्राटदारांना दर महिन्याला ४० ते ५० टक्के देयके प्राप्त होत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास कंत्राटदारांवरील आर्थिक संकट आणखी गंभीर हाेईल. वेळेवर वेतन न मिळाल्यास कामगारांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. यामुळे या मागणीकडे शासन व महाजेनकाे प्रशासनाने गांभीर्याने बघावे, अशी प्रतिक्रिया खापरखेडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी व्यक्त केली आहे.