लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसी आणि हिंगणा परिसरात झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने १२ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मंजूर केला.
८ नोव्हेंबरच्या रात्री कुख्यात गुंड निंबू ऊर्फ शुभम गजानन निंबूळकर (वय २१), मंगेश भरत राय (वय २०) आणि आकाश माणिक शिंदे (वय १९) या तिघांनी क्षुल्लक कारणावरून छत्तीसगडी मजूर सुरज दुर्गे (रा. जयताळा) याची निर्घृण हत्या केली होती. एमआयडीसी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हत्येचा दुसरा गुन्हा हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेळाहरी परिसरात झाला होता. बिरयानी खाताना वाद झाल्यानंतर विनीत बनसोड याने आरोपी अनिकेत मेश्राम याला थप्पड लगावली होती. त्याचा सूड घेण्यासाठी आरोपी अनिकेतने विनीतला शनिवारी दारू पिण्याच्या बहाण्याने वेळाहरी परिसरात नेले आणि दारूच्या नशेत टुन्न झाल्यानंतर दगडाने ठेचून विनीतची हत्या केली. हिंगणा पोलिसांनी आरोपी अनिकेत मेश्रामला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.
पालकर हत्याकांडात एक गजाआड
अनिल पालकर हत्याकांडात प्रतापनगर पोलिसांनी आरोपी संतोष शाहू (रा. गोपालनगर, तिसरा बसथांबा) याला अटक केली. दुसरा आरोपी चंदन नायर फरार आहे.
दारूच्या नशेत टुन्न असलेल्या पालकरने एका महिलेसमोर लघवी केली आणि हटकले असता तिला शिवीगाळ केली. त्याला आरोपी शाहू आणि नायरने आक्षेप घेतला असता पालकरने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे आरोपींनी चाकूहल्ला करून पालकरची हत्या केली. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या काही वेळेतच पोलिसांनी आरोपी शाहूला अटक केली. नायर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
----