अनेक प्रकरणात गैरवापर : मालमत्ता हडपल्याची चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर अवैधरीत्या विकून त्या माध्यमातून गुंड, अवैध सावकार आणि भूमाफियांची मदत करणाऱ्या आरोपींचा पीसीआर ३० मेपर्यंत वाढला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सूत्रधार बीना यशवंत अडवाणी (वय ६०, रा. उत्कर्षनगर, वलय अपार्टमेंट, धरमपेठ) या महिलेवर यापूर्वीही गुन्हा दाखल झाला होता, असे पोलीस तपासात उघड झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छडा लावला होता. या टोळीतील दोन महिलांसह चौघांना पोलिसांनी अटक केली. टोळीची सूत्रधार बीना यशवंत अडवाणी असून, तिच्यासाठी भीमाताई राजू वानखेडे (वय ५३, रा. भिलगाव), आशिष गुलाबराव शेंडे (वय २७, रा. सुभाषनगर, अंबाझरी) आणि हिमांशू धीरज सहारे (वय २०, रा. खलासी लाईन, सदर) हे काम करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून प्रारंभी ४७ आणि नंतर ५६ स्टॅम्प पेपर जप्त केले. दरम्यान, या टोळीकडून विकत घेतलेल्या जुन्या तारखांच्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून अनेक गुंड, अवैध सावकारी करणारे आणि भूमाफियांनी अनेकांची लाखोंची मालमत्ता हडपल्याची जोरदार चर्चा आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही या आरोपींपैकी काहींवर असेच गुन्हे सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज शुक्रवारी संपल्याने, त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पुन्हा पीसीआर मिळावा म्हणून पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी अडवाणी आणि अन्य आरोपींना ३० मेपर्यंत पीसीआर वाढवून दिला.
---
आयुक्तांकडे वकिलाची तक्रार
दरम्यान, यापूर्वी बनावट स्टॅम्प पेपरचे एक मोठे प्रकरण नागपुरात उघड झाले होते. अजनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यात नागपुरातील भूमाफियांसह मुंबईच्याही आरोपीचा समावेश होता. त्या गुन्ह्याचा नव्याने तपास करावा, अशी मागणी ॲड. सतीश उके यांनी १३ मे रोजी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
---