तीन लाखांची लाच : एसीबीची साथीदारांवर नजर
--घरझडतीत फारसे काही मिळाले नाही
--वरिष्ठ संशयाच्या घेऱ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन लाख रुपयांची लाच मागणारा महापालिकेचा लाचखोर कर संग्राहक तसेच कंत्राटी सुपरवायझरला न्यायालयाने एक दिवसाचा पीसीआर मंजूर केला. एसीबीच्या पथकाने कर संग्राहक सुरज सुरेंद्र गणवीर (रा. भंडारा मोहल्ला, इंदोरा) आणि सुपरवायझर रवींद्र भाऊराव बागडे (रा. गणेश नगरी अपार्टमेंट, कोराडी) या दोघांना शुक्रवारी जेरबंद केले होते.
जरीपटका येथील रामचंद्र जेठाणी यांचे गंगोत्री रिसॉर्ट अँड लॉन आहे. आरोपी गणवीर आणि बागडे या दोघांनी संगनमत करून या लॉनवर ८० लाखाचा कर काढला होता.
कोरोनामुळे वर्षभरापासून लॉन बंद असल्यामुळे एवढ्या प्रचंड रकमेचा कर निर्धारित कसा झाला, हा प्रश्न होता. जेठानी यांनी गणवीर आणि बागडेशी संपर्क साधला असता त्यांनी हा कर माफ करण्यासाठी थेट सहा लाख रुपयांची मागणी केली. नंतर आरोपी तीन लाख रुपयांच्या मागणीवर आले. लाच न दिल्यास कारवाई करू, असेही गणवीर आणि बागडेने जेठाणींना सांगितले होते. त्यामुळे जेठाणी यांनी एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्याआधारे सापळा लावून एसीबीच्या पथकाने गणवीर आणि बागडेच्या शुक्रवारी सायंकाळी मुसक्या बांधल्या. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींचे व्हाॅईस सॅम्पल घ्यायचे आहेत, असे सांगून तपास अधिकारी पाटील यांनी आरोपींचा एक दिवस पीसीआर मिळवला. दरम्यान, गणवीरच्या
कार्यालय आणि निवासस्थानाची एसीबीने झडती घेतली.
मात्र, त्यात फारसे काही मिळाले नाही, असे पोलीस अधीक्षक नांदेडकर यांनी सांगितले. प्रकरणाशी संबंधित बाबी लक्षात घेता गणवीर, बागडेच्या साथीदारांवर एसीबीने नजर रोखली आहे
---
सफाई कर्मचारी, पूर्ण अधिकारी!
या कारवाईमुळे एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. ती म्हणजे, गणवीर हा आसिनगर झोनमध्ये सफाई कर्मचारी आहे. मात्र, त्याला चक्क कर संग्राहकाची जबाबदारी देण्यात आली. ही बाब एसीबीच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्र तपासाचा विषय वाटत आहे. याचमुळे टॅक्स कलेक्टरसह अनेकांना विचारपूस केली जाणार आहे.
---