मनिष श्रीवास हत्याकांड : गँगस्टर सफेलकरचा साथीदार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड दिवाकर बबन कोतुलवार (वय ३६) याला २७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्या. व. भ. कुलकर्णी यांनी दिले.
कोतुलवार हा शहरातील कुख्यात गुंड असून त्याच्याबद्दल हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी वसुली असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या साथीदारांसह मॉन्टी सरदारची हत्या केली होती. पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याने या हत्याकांडात सहभागी आरोपींची नावे सांगतानाच मनीष श्रीवास हासुद्धा या हत्याकांडात सहभागी होता, असे पोलिसांना सांगितले होते. मनीष श्रीवासची या हत्याकांडापूर्वीच कुख्यात गँगस्टर रणजीत सफेलकर आणि त्याच्या साथीदारांनी हत्या केली होती. त्यामुळे मोंटी सरदारच्या हत्येत सहभागी होण्याचा त्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, मनीष श्रीवास हत्याकांड उघड होऊ नये, या कलुषित इराद्याने त्याने जाणीवपूर्वक पोलिसांना खोटी माहिती दिली. त्याचमुळे मनीष श्रीवास हत्याकांड दडपले गेले. मात्र, अलीकडे मनीष श्रीवास हत्याकांडाची पाळेमुळे खोदून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी सफेलकर, भारत आणि शरद हाटे, सिनु अण्णा, छोटू बागडे, इशाक मस्ते आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. त्यामुळे कोतुलवारचा खोटेपणा उघड झाला. तो रणजित सफेलकरचा साथीदार असल्याचेही उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. आज त्याच्या कोठडीचा शेवटचा दिवस असल्यामुळे गुन्हे शाखा पथकाने त्याला न्यायालयात हजर केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्या. कुलकर्णी यांनी आरोपी कोतुलवारला दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त भीमानंद नलावडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
---