गर्भजल तपासणी प्रयोगशाळा फेब्रुवारीपासून सुरू होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 08:02 PM2018-01-11T20:02:39+5:302018-01-11T20:04:27+5:30
मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयांतील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) व संबंधित चाचण्या येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू केल्या जातील अशी सिकलसेल रुग्णांना दिलासा देणारी माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयांतील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) व संबंधित चाचण्या येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू केल्या जातील अशी सिकलसेल रुग्णांना दिलासा देणारी माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. परिणामी अनेक महिन्यांपासूनची प्रतीक्षा संपण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.
सिकलसेल आजाराचे अस्तित्व असलेल्या कुटुंबात जन्मणाऱ्या बाळाला सिकलसेल आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी गर्भजल तपासणी केली जाते. त्या तपासणीत बाळाला सिकलसेल आजार आढळून आल्यास पुढील आवश्यक निर्णय घेणे शक्य होते. विदर्भातील सिकलसेल रुग्णांच्या सुविधेसाठी २००६ मध्ये मेयो व मेडिकल रुग्णालयांत गर्भजल तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या होत्या. परंतु, आवश्यक तज्ज्ञ व कर्मचारी नसल्यामुळे दोन्ही प्रयोगशाळांचा उपयोग होऊ शकला नाही. सध्या गर्भजलाचे नमुने मुंबईला पाठवावे लागत असून पीडितांना प्रत्येक नमुन्यामागे ४ ते ५ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने यासंदर्भात वेळोवेळी आवश्यक आदेश दिलेत. परिणामी, शासनाने दोन्ही रुग्णालयांतील प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी वेगात हालचाली करायला सुरुवात केली आहे. प्रयोगशाळा येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. सिकलसेल रुग्णांच्या समस्यांबाबत न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात अॅड. अनुप गिल्डा न्यायालय मित्र आहेत.