नरखेड : नरखेड पाेलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी (दि. २६) शांतता सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. काेराेना संक्रमण लक्षात घेता नागरिकांनी आगामी सर्व सण घरीच साजरे करावे, असे आवाहन ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी केले.
मार्चच्या शेवटी व एप्रिलमध्ये हाेळी, धुलीवंदन, शिवजयंती, गुड फ्रायडे यांसह अन्य सण व उत्सव आहेत. आधीच दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या सण व उत्सवांमध्ये हाेणारी गर्दी काेराेनाच्या पथ्यावर पडू शकते. स्वत:ची, कुटुंबीयांची व इतरांची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने हे सण व उत्सव घरीच साजरे करावे तसेच प्रत्येकाने विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, घराबाहेर पडताना मास्कचा नियमित वापर करावा, शिवाय गर्दी करणे किंवा गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहनही जयपालसिंग गिरासे यांनी केले. या सभेला शहरातील निवडक नागरिक उपस्थित हाेते.