आचार्यश्री पूर्णचंद्र सुरीश्वर महाराज : श्री संभवनाथ जैन मंदिर येथे प्रवचनमाला नागपूर : श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर, वर्धमननगर येथे पर्वाधिराज पर्युषण पर्वावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चातुर्मासात विराजमान असलेले आचार्यश्री पूर्णचंद्र सुरीश्वर महाराजांनी यावेळी भाविकांना उपदेश केला. अंतर्मनात डोकावण्याचे पर्व म्हणजेच पर्युषण पर्व असून त्यामुळेच हे महान पर्व असल्याचा उपदेश त्यांनी केला. केवळ भारतच नाही तर जगभरात राहणारे जैन लोक आत्मशुद्धीचे लक्ष्य मिळविण्यासाठी आपापल्या शक्तीनुरुप जप, तप, त्याग, धर्मक्रिया, दान-पुण्य करतात. त्यानंतर गंगा नदीत स्नान करून सारे पाप दूर करून शुद्ध होण्याचा प्रयत्न करतात. गुरुच्या आज्ञेने शुद्ध होण्याचा संकल्प करतात. आत्मजागृती आणि शुद्धीचेच हे पर्व आहे. आत्मा शुद्ध करण्यासाठी विकार, वासना आम्हाला सोडाव्या लागतात. आपण भौतिकवादी असतो पण पर्युषणात आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करायला हवा. याप्रसंगी त्यांनी भाविकांना ११ कर्तव्यांबाबत सचेत केले. वर्धमाननगर जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष गणेश जैन यांनी भाविकांना या प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मुनीश्री सुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिर, इतवारी येथे जैन आचार्य विनयसागरजी आणि युवा प्रवचनकार मुनी रवी पद्मसागरजी आणि साध्वी प्रीतीधर्माजी म. सा. यांच्या सानिध्यात पर्वाधिराज पर्युषण पर्वाच्या आराधना श्रद्धेने सुरू आहेत. मुनीश्री विनयसागर महाराज म्हणाले, भारत हा आध्यात्मिक देश असून येथील कणाकणात योग सामावला आहे. ही संत महात्म्यांची भूमी असून सदाचार, सेवा या मातीचाच गुण आहे. पर्युषणाचा अर्थ आत्म्याच्या निकट राहणे आहे. पर्युषणाचे पाच कर्तव्य आहे. अहिंसा, दया, भक्ती, तीन उपवास, चैत्य परिपाटी काढणे आणि परमेश्वराचे उपकार कधी न विसरणे हे आहे. यानिमित्ताने विविध जैन मंदिरात महाराज आणि साध्वींच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अंतर्मनात डोकावण्याचे पर्व म्हणजेच पर्युषण
By admin | Published: September 13, 2015 2:42 AM