सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा : आज शहीद चौकात समारोप नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्यावतीने काढण्यात आलेली सेवाग्राम ते नागपूर ही पदयात्रा शुक्रवारी सायंकाळी नागपुरात दाखल झाली. क्रांतिदिन ९ आॅगस्टपासून सेवाग्राम येथून ही पदयात्रा सुरू झाली. या दरम्यान नागपूरपर्यंत प्रत्येक गावातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आसोला या गावात महिलाची भव्य सभा पार पडली. या सभेत दारुबंदी संघटना स्थापन करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी ही पदयात्रा छत्रपती चौकात पोहोचली. याप्रसंगी भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. १५ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता ही पदयात्रा शहीद चौकात पोहोचेल. तिथे या पदयात्रेचा समारोप होईल.या पदयात्रेमध्ये प्रमोद भोसकर, तुषार उमाळे, आॅल इंडिया वर्कर्स कौन्सिलच्या सेक्रेटरी डॉ. नयना धवड, माला फुले, आपच्या रंजना मामर्डे, सय्यद कादर जफार, नारायण कादी, विजयाताई धोटे, क्रांती धोटे, अरविंद देशमुख, प्रा. निसर्ग पांडे, सुनील चोखारे, राजेश लांडगे, संजीवन वालदे, मोतीराम सिंह, शैलेश धर्माधिकारी, अनुप जोगळेकर, डॉ. प्रभाकर बोरकर आणि स्टोन संघटनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)विदर्भ स्वतंत्र केल्याशिवाय मी मरणार नाहीविदर्भ स्वतंत्र केल्याशिवाय मी मरणार नाही, असे भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी स्पष्ट केले. या पदयात्रेत मला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. या पदयात्रेचे विशेष असे की यात पैशाचा खर्च बिलकुल केला गेला नाही. ज्या गावात पदयात्रा थांबायची, त्या गावातील लोकं विदर्भाच्या नावावर त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था आनंदात करायचे. यातून लोकांना विदर्भ हवा आहे, हेच पुन्हा एकदा लोकांनी सिद्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र विदर्भाची पदयात्रा नागपुरात दाखल
By admin | Published: August 15, 2015 3:00 AM