तालुका टास्क फोर्स स्थापन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत वैद्यकीय जगताकडून करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेचा इशारा पाहता लहान मुले व बालकांसाठी ग्रामीण भागात तालुकानिहाय पेडियाट्रिक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, इमारत स्तरावर पेडियाट्रिक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे.
या सेंटरद्वारे १३० बेड उपलब्ध होतील. त्यामध्ये नवीन व प्रशस्त इमारत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्राधान्य द्यावे. बालकांच्या काळजीसाठी त्यांच्या मातादेखील सोबत राहतील. त्यांच्या निवासाची व्यवस्था प्रस्तावित सेंटरमध्ये किंवा त्या लगतच्या परिसरात करण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पेडियाट्रिक कोविड केअर सेंटरच्या कामासाठी तालुका टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, तहसीलदार याचे अध्यक्ष तर तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
यादरम्यान मनुष्यबळ, औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता करून देण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक सेंटरला सहा महिन्यांसाठी ५० लाख रुपयांचा निधी खर्च अंदाजित आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन व जिल्हा व्यवस्थापन निधीतून हा खर्च करण्यात येईल. सध्या केलेल्या नियोजनानुसार ६५४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. टेलिमेडिसिन उपचार पद्धतीद्वारे शहरातील बालरोगतज्ज्ञ या सेंटरमधील कार्यरत डॉक्टरांना उपचार पद्धतीत मार्गदर्शन करतील. मेडिकल व पॅरामेडिकल स्टॉफला पेडियाट्रिक कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण या महिना अखेरपर्यंत देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील ५ लाख ७३ हजार २९४ जण
जिल्ह्यात ० ते ६ वयोगटात १ लाख ६७ हजार ५०१, ६ ते १८ वयोगटात ४ लाख ५ हजार ७९३ अशी बालकांची संख्या असून, ० ते १८ मध्ये एकूण ५ लाख ७३ हजार २९४ बालकांची संख्या आहे.
बॉक्स
प्रस्तावित पेडियाट्रिक कोविड केअर सेंटर
भिवापूर तालुक्यात प्रा. आ. केंद्र सोमनाळा, हिंगणा तालुक्यात प्रा. आ. केंद्र टाकळघाट, रामटेक तालुक्यात प्रा. आ. केंद्र मनसर, नागपूर तालुक्यात प्रा. आ. केंद्र सालई गोधाणी, काटोल तालुक्यात प्रा. आ. केंद्र येनवा, कळमेश्वर तालुक्यात प्रा. आ. केंद्र धापेवाडा, सावनेर तालुक्यात प्रा. आ. केंद्र. पाटणसावंगी, कुही तालुक्यात प्रा. आ. केंद्र तितूर, नरखेड तालुक्यात प्रा. आ. केंद्र भिष्णूर, कामठी तालुक्यात प्रा. आ. केंद्र भूगाव, मौदा तालुक्यात प्रा. आ. केंद्र धानला, पारशिवणी तालुक्यात प्रा. आ. केंद्र साटक, उमरेड तालुक्यात प्रा. आ. केंद्र पाचगाव.
बॉक्स
सुनील केदार यांनी घेतला आढावा
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सोमवारी ग्रामीण भागाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, महिला व बालकल्याण समिती सभापती उज्ज्वला बोढारे, शिक्षण सभापती भारती पाटील, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, नाना कंबाले, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, बबलू बर्वे उपस्थित होते. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार मेडिकल व मेयोमध्ये काही बेड राखीव ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.