लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय म्हणून २१ दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सोबतच कर्फ्यू लावल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यात अडचणी येत आहेत. अशा स्थितीत मुलांच्या आरोग्याची चिंता पालकांना भेडसावत आहे. त्यासाठी नागपुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी पुढाकार घेऊन विदर्भातील बालरोग तज्ज्ञांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून सर्व डॉक्टर बालकांच्या आरोग्यासाठी मिळून काम करीत आहेत.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरु असताना एकही बालक उपचारापासून वंचित राहू नये यासाठी व्हॉटसअॅपवर ‘कोरोना चाईल्ड हेल्प’ नावाने ग्रुप तयार करण्यात आला आहे. यात विदर्भातील नागपूरसह अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया येथील बालरोगतज्ज्ञांना जोडण्यात आले आहे. नागपुरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर हे या ग्रुपचे नेतृत्व करीत आहेत. या ग्रुपमध्ये डॉक्टरांशिवाय नागपूरसह विदर्भातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत नागरिकांना समाविष्ट करण्यात आले आहे. विदर्भातील कोणत्याही लहान मुलाला प्रकृतीबाबत समस्या निर्माण झाल्यास या ग्रुपवर नागरिक मॅसेज करतील. त्यानंतर ग्रुपमधील बालरोगतज्ज्ञ संबंधित मुलाची मदत करतील. विशेष म्हणजे विदर्भातील बालरोग तज्ज्ञ या ग्रुपच्या माध्यमातून नागपूरच्या बालरोगतज्ज्ञांची उपचारादरम्यान मदत घेऊ शकतील.