भीमसेनेच्या अध्यक्षासह सहा जणांना अटक १२ पर्यंत पीसीआर न्यायालयाबाहेर आरोपींच्या समर्थकांची गदीनागपूर/वाडी : दत्तवाडी येथे शुक्रवारच्या रात्री एका तरुणाचे पाच लाखाच्या खंडणीसाठी कारमधून अपहरण केल्यानंतर देशीकट्ट्यातून गोळी झाडून जखमी केल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी भीमसेनेच्या अध्यक्षासह सहा जणांना अटक केली. त्यांना अवकाशकालीन न्यायाधीश श्रीमती एस. ए. हरणे यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. न्यायालयाच्या बाहेर आरोपींच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे जबरदस्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. भीमसेनेचा अध्यक्ष समीर ऊर्फ पप्पू नरेंद्र मेंढे (२७) रा. धम्मकीर्तीनगर दत्तवाडी, राजेश जीवन जंगले (३३), आशिष ऊर्फ छोटू बुच्चन झा (२९), नीतेश जीवन जंगले (३२) सर्व रा. आंबेडकरनगर वाडी, सतीश कुलदीप सहारे (३१) रा. शिवाजीनगर वाडी, सूरज ऊर्फ मुसा मोरेश्वर वानखेडे (३१) रा. त्रिशरण चौक वाडी कंट्रोल, अशी आरोपींची नावे आहेत. कुणाल देवराव सातपुते (२३) रा. हरिओम सोसायटी दत्तवाडी, असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रकरण असे, शुक्रवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास कुणाल सातपुते हा आपल्या मित्राला भेटण्यास दत्तवाडी येथील जिंदल लॉन येथे गेला होता. मित्र न भेटल्याने तो परत जाण्यास निघाला होता, अचानक त्याच्यासमोर पांढऱ्या रंगाची वर्ना कार थांबली. आरोपी समीर कार चालवीत होता. राजेश जंगले बाजूला बसलेला होता. बाकीचे मागच्या सीटवर होते. राजेशने कुणाल याला म्हटले, ‘भाईगिरी का तुमको बहुत भूत सवार है’. तुला व तुझ्या घरच्या लोकांना सोडणार नाही, तुला पाच लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील. मी नोकरी करतो, अशा भानगडीत पडत नाही, असे कुणालने म्हणताच सतीश सहारे याने ओढून त्याला कारमध्ये कोंबले, मारहाण केली. साईनगर दाभा भागातील गणेशनगरच्या मोकळ्या मैदानात नेले. तुला व भावाला संपवतो, अशी राजेश जंगलेने धमकी दिली. सर्वांनी त्याच्याजवळील १० हजार रुपये रोख आणि ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतली. त्यानंतर समीर मेंढे याने त्याच्या उजव्या पायाच्या मांडीच्या खालच्या बाजूला देशीकट्ट्यातून गोळी झाडून त्याला जखमी केले. या घटनेची माहिती कुणालने मोबाईलने वाडी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला उपचारार्थ मेयो इस्पितळात दाखल केले.कुणालच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी भादंविच्या ३६४ (अ), ३६५, ३८६, ३९५, ३९७, ३०७, १२० (ब), शस्त्र कायदा ३/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करून शनिवारी सकाळी सर्व सहाही आरोपींना अटक केली. पोलीस ठाण्यात आरोपींनी अटक फॉर्मवर सही करण्यास नकार दिला. शनिवारी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून १५ जानेवारीपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, देशीकट्टा, लुटीचा माल जप्त करणे आहे, देशीकट्टा कोठून आणला त्याबाबत चौकशी करणे आहे, असे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले. आरोपींचे वकील अॅड. प्रफुल्ल मोहगावकर आणि अॅड. पराग उके यांनी पोलीस कोठडी रिमांडच्या मागणीला नाहरकत दिली. मात्र सत्याचा उलगडा होण्यासाठी ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात यावा, अशी विनंती केली. न्यायालयाने या सहाही आरोपींना १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी निर्दोष आहेत. त्यांना मुद्दाम या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे, असे न्यायालयासमोर जमलेल्या आरोपींच्या समर्थकांनी मागणी केली.(प्रतिनिधी)
अपहरण करून तरुणावर झाडली गोळी
By admin | Published: January 10, 2016 3:36 AM